भिवंडीतील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयासमोर एका पोलीस खबऱ्याने आत्मदहनाचा केलेला प्रयत्न पोलिसांच्या अंगलट आला असून याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या तिघा हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे. अशोक पाटील, लक्ष्मण जाधव आणि प्रकाश नाईक अशी या तिघा हवालदारांची नावे असून सर्जेराव पाटील आणि डी.डी.पाटील या दोघा हवालदारांची बदली करण्यात आली आहे. भिवंडी परिसरातील कुप्रसिद्ध दहशतवादी साकिब नाचण याच्याविषयी माहिती पोलिसांना देणारा मोहम्मद अन्सारी या खबऱ्याने गुरुवारी गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. अन्सारी हा ४० टक्के भाजला असून त्याच्यावर ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाचणसंबंधी पोलिसांना माहिती देणाऱ्या खबऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने याप्रकरणी पोलीसही चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.    

Story img Loader