नेरुळ सी-वूड येथील तलावात संगीतकार ललित पंडित यांच्या भगिनी संध्या सिंग यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडून एक आठवडा झाला तरी नवी मुंबई पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. या संदर्भात पोलिसांनी सिंग यांचा मुलगा व त्याची प्रेयसी यांची चौकशी केली आहे. सिंग यांच्या मोबाइलवर झालेले शेवटचे संभाषण पोलीस तपासून पाहात आहेत. सिंग यांचे पती सीमा शुल्क विभागाचे आयुक्त असल्याने हे प्रकरण लवकरच केंद्रीय पातळीवरील एखाद्या यंत्रणेकडे सुपूर्द केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेरुळ सी-वूड येथील अनिवासी भारतीय संकुलाच्या फेज दोनमध्ये संध्या सिंग (५०) राहत होत्या. १२ डिसेंबर रोजी त्या नेरुळ येथील एका बँकेत सोने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. त्यामुळे ललित पंडित यांनी १३ डिसेंबर रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. मात्र पोलीस सिंग यांचा शोध लावू शकले नाहीत. ९ जानेवारीच्या पहाटे एका पक्षिप्रेमीने दिल्ली पब्लिक स्कूलच्या मागील तलावाजवळ एका महिलेचे मृत अवशेष पाहिले. त्याने नवी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर ललित पंडित यांनी ते अवशेष आपल्या बहिणीचे असल्याचे सांगितले. पोलिसांनीही ते अवशेष न्यायवैद्यकीय विभागाकडे पाठविले. तो अहवालही आला असून ते अवशेष सिंग यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी हे मृत अवशेष सापडून एक आठवडा होईल तरीही पोलिसांच्या हाती ठोस असे काही सापडलेले नाही.  
दरम्यान या प्रकरणात सिंग यांना चांगले परिचित असणारे आरोपी असून हा खून पैशांसाठी झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. टीव्ही चॅनल्सवर चालणाऱ्या गुन्हेगारी मालिकांचा आधार घेऊन हा खून करण्यात आला असून सिंग यांचा मृतदेह या तलावात रात्रीच्या वेळी आणून टाकण्यात आला असावा असेही पोलिसांचे मत आहे. बेपत्ता असल्याची तक्रार करूनही नवी मुंबई पोलीस शोध लावू शकले आणि मृतदेह सापडल्यानंतरही काहीही प्रगती नसल्याने सिंग यांचे पती जयप्रकाश सिंग, भाऊ संगीतकार ललित पंडित, अभिनेत्री भगिनी सुलक्षणा, विजया पंडित यांनी हा तपास उच्च पातळीवर व्हावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या गूढ खुनाचा तपास केंद्रीय पातळीवरील एखाद्या यंत्रणेद्वारे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  
दरम्यान, जयप्रकाश सिंग यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन एनआरआय पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी यांच्यावर आरोप केले. सिंग यांच्या बेपत्ता होण्यापूर्वी सतत तीन दिवस बेहराणी यांचे सिंग यांच्या बरोबर मोबाईल संभाषण सुरु होते. त्या अधिकाऱ्याची चौकशी का केली जात नाही, असे सिंग यांनी म्हटले आहे. नातेवाईकांची चौकशी केली जात असल्याने सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संर्दभात बेहराणी यांनी आपण सिंग यांच्याशी संभाषण केले असून ते त्यांच्या घरातील चोरींविषयी होते. त्या स्वत: आपल्याला फोन करीत होत्या, असे त्यांनी पत्रकरांजवळ स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा