मुंबई : परळ वर्कशॉप येथून निघालेल्या गणेश मूर्ती आगमन मिरवणूकीदरम्यान गणेशभक्तांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार केला जात असल्याचा आरोप गणेशोत्सव मंडळांनी केला आहे. आगमन मिरवणुकीबाबत पोलीस स्थानकात माहिती देऊनही अशी कारवाई केली जाते, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गणेशोत्सव समन्वय समितीने नाराजी व्यक्त केली असून पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

गणेशोत्सवाला मोजके दिवस शिल्लक असून लालबाग परळ या भागात दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. परिसरात मोठ्या गणेशमूर्तींचे अनेक कारखाने आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती तेथे तयार होतात. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी महिनाभर आधीपासून मूर्ती मंडळात आणून ठेवल्या जातात व त्यानंतर सजावट केली जाते. यंदाही गणेश मूर्ती आधीच आणण्यास सुरुवात झालेली आहे. रविवारचा मुहूर्त साधून अनेक मंडळांच्या गणेशमूर्ती आगमन मिरवणुका निघाल्या. मात्र या मिरवणुकीच्यावेळी गणेश भक्तांवर सौम्य लाठीहल्ला पोलीस करीत असल्याची तक्रार मंडळांनी समन्वय समितीकडे केली आहे. त्यामुळे समन्वय समितीचे प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live: अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

सध्या लालबाग, परळ मध्ये गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सामानाच्या खरेदीसाठी येणारे भक्त यांची गर्दी होऊ लागली आहे. त्यातच आगमन मिरवणुकीच्यावेळी दर्शन घ्यायला थांबणाऱ्या भक्तांची फोटो काढून घेण्यासाठीही झुंबड उडते. त्यामुळे या परिसरात रविवारी वाहतूक कोंडी होते. अशा परिस्थितीत पोलीस मिरवणुकीतील कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला करतात अशी तक्रार समन्वय समितीने केली आहे. आगमन मिरवणुकीपूर्वी नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी अशी सूचना समितीने मंडळांना दिली आहे. त्यानुसार मंडळांनी माहिती दिली तरीही भोईवाडा पोलीस कारवाई करत असल्याचा आरोप समितीने केला आहे. गणेशोत्सव ही मुंबईची ओळख असून येत्या काही दिवसात आगमन मिरवणुकांचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाला योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी समितीने केली आहे.

Story img Loader