मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी  शुक्रवारी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली.  नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे जाहीर केले होते. शुक्रवारी राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले.  त्यांच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानी उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कुठलीही कृती करू नका असे आवाहनही यावेळी त्यांना करण्यात आले. वांद्रे पूर्व परिसरात शिवसैनिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ अंतर्गत खेरवाडी पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीमध्ये जमावबंदीचा अथवा सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे कोणतेही कृत्य न करण्याची समज राणा यांना देण्यात आली आहे. त्यानंतरही तसे कृत्य केल्यास त्याला आपणास जबाबदार धरण्यात येईल. तसेच ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल, असेही या नोटीशीत नमूद केले आहे. दरम्यान, पोलिसांनी मातोश्री, वर्षांसह शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानीही अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police notice rana couple action recitation hanuman chalisa front matoshri ysh