स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करणारे चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत महाजन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या घटनेचे वृत्त समजताच धक्का बसलेल्या त्यांच्या पत्नीही नाशिक येथील रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येत आहे.
  चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत महाजन (४२) यांनी बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास आपल्या केबीनमध्ये गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर चेंबूरच्या सुराणा सेठिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी त्यांच्या पत्नी भांडण करून मुलांसह माहेरी निघून गेल्या होत्या. त्यातच एका प्रकरणावरून पोलीस उपायुक्तांनी त्यांना दमात घेतले होते. त्यामुळे महाजन यांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला होता. भांडणानंतर नाशिक येथे गेलेल्या महाजन यांच्या पत्नीला हे वृत्त ऐकून  धक्का बसला . त्यांचा जबाब नोंदविण्यासाठीपोलिसांचे पथक नाशिकला गेले आहे.
 याप्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद भिसे यांच्यामार्फत होणार आहे. या चौकशीत नेमके कारण स्पष्ट होईल, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त खालिद कैसर यांनी सांगितले.