गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांची प्रतिमा काहीशी डागाळल्याचं पाहायला मिळत आहे. परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब, त्याआधी अँटिलियाबाहेर सापडलेली स्फोटकं आणि त्यात सचिन वाझेंसह इतरही काही पोलीस अधिकाऱ्यांचा हात, मनसुख हिरेन हत्या प्रकरण ते अगदी अलिकडे एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना झालेली अटक या सगळ्यामध्ये मुंबई पोलिसांबद्दल संशयाचं वातावरण निर्माण झालं असताना आता राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात ८ वर्षांहून अधिक काळ सेवा देणारे पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या मुंबईच्या बाहेर बदल्या करण्यात येणार असल्याचा निर्णय संजय पांडे यांनी घेतला आहे.
एकाच वेळी ७२७ अधिकारी जाणार मुंबईबाहेर!
मुंबई पोलीस दलामध्ये अनेक अधिकारी अशा प्रकारे दीर्घ काळ शहरात सेवेमध्ये राहिले आहेत. त्यांचा आकडा जवळपास ७२७ च्या घरात जातो. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता हे ७२७ अधिकारी एकाच वेळी मुंबईच्या बाहेर बदली होऊन जाणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस दलात हा मोठा फेरबदल मानला जात आहे. या अधिकाऱ्यांना त्यांच्या आवडीच्या ३ जिल्ह्यांची बदलीसाठी निवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या तीनपैकी एक जिल्हा त्यांचा मूळ जिल्हा ठेवण्याची मुभा देखील देण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
ED च्या छाप्यांनंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “परमबीर सिंह यांची भूमिका…!”
नवी मुंबई, ठाणे, पुण्यातही होणार अंमलबजावणी
दरम्यान, मुंबई शहरासाठी जो निर्णय लागू करण्यात आला आहे, तोच निर्णय नवी मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांसाठी देखील लागू असेल, अशीही माहिती मिळतेय. त्यामुळे या तीन शहांमधील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्याही बदल्या होण्याची शक्यता आहे.