नवीमुंबई पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदारास करोनाची लागण झाली असून त्यांच्या पत्नीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मुलांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यता आले आहे. पत्नाच्या अंत्यसंस्कारसही या कर्मचाऱ्यास जाता आले नाही.

या सर्व धक्कादायक घडामोडींमुळे नैराश्यात गेलेल्या या हवालदाराचे वरिष्ठ अधिकाऱ्याने समुपदेशन केलं आहे. यामुळे आता ते नैराश्यातून बाहेर आले आहेत. मात्र त्यामुळे दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांना आता तरी  नागरिकांनी करोना विरोधातील लढाईत साथ द्यावी अशी आशा केली जात आहे.

नवीमुंबई पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला एक हवालदार आरोग्याच्या समस्येमुळे काही आठवड्यापासून सुट्टीवर होता. ठाणे येथे राहत असलेल्या या पोलीस हवादारास करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु असतनाच त्यांच्या पत्नीमध्येही करोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांच्यावर काही दिवस खासगी डॉक्टर उपचार करीत होते, अखेर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व परिस्थितीमुळे संबंधित पोलीस कर्मचारी अत्यंत नैराश्यात गेल्याचे त्यांच्या सहकारी मित्रांद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजले होते.

यानंतर त्यांनी पुढाकार घेत त्यांचे समुपदेशन केले व त्यास नैराश्यातून बाहेर काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. योग्य समुपदेशन केल्याने त्यांच्या मनस्थितीत सकारात्मक परिणाम झाला. मात्र दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचा उपचारादरम्यान दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण कोरोना असल्याचा अहवाल शनिवारी उशिरा प्राप्त झाला.  सध्या त्यांच्या मुलांची कोरोना तपासणी करण्यात आली असून अहवाल येणे बाकी आहे. मात्र त्यांना अलगीकरण करण्यात आले आहे. दुर्देवाची बाबा म्हणजे या पोलीस कर्मचाऱ्यास स्वतःच्या पत्नीच्या अंत्यसंस्कारासही उपस्थित राहता आलेले नाही.

संबंधित कर्मचारी वैद्यकीय रजेवर होता. त्यांना कोरोना संसर्ग नेमका कुठून झाला याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पत्नीचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून मुलांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती नवीमुंबई पोलीस सह आयुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे.

कोरोना बाधित कर्मचारी वैद्यकीय रजेवर तीन आठवड्यापासून असल्याने त्याला कोरोना संसर्ग नवीमुंबईत झाला नसल्याचा प्रार्थमिक अंदाजा असला तरी युद्ध पातळीवर नवीमुंबई मुख्यालय आणि अन्य पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे .