सोनसाखळी चोरीच्या घटनांनी सामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाणे आणि गुन्हे अन्वेषण विभाग या चोरांना जेरबंद करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दहिसर ते वांद्रे परिसरात सोनसाखळी चोरांसाठी सापळे रचण्यात आले. त्यासाठी सोन्याचे हुबेहूब दागिने घालून महिला पोलिसांना उभे करण्यात आले. परंतु चोर फिरकलेच नाहीत. आढावा घेतला असता काही पोलिसांनीच ही माहिती बाहेर फोडल्याचे स्पष्ट झाले आहे.
दररोज दोन ते तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र त्या तुलनेत आरोपींना अटक होत नाही. अनेक ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढविली आहे. काही ठिकाणी हे पोलीस सोनसाखळी चोरांचा माग घेण्याऐवजी हेल्मेट न घेतलेल्या बाईकस्वारांकडून मलिदा उकळण्याचे उद्योग करीत आहेत. सोनसाखळी चोर आवाक्यात येत नाही हे पाहून दहिसर ते वांद्रे परिसरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बैठकीत एक शक्कल लढविण्यात आली. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीची ठिकाणे निश्चित करण्यात आली. सोनारांकडून हुबेहूब दिसतील असे दागिने तयार करून घेण्यात आले. महिला पोलिसांना साध्या वेशात अशा गल्ल्या, मॉल्स, बाजारात फिरण्यास सांगण्यात आले. या महिला पोलिसांच्या दिमतीला शिपाई देण्यात आले. परंतु तीन-चार दिवस उलटले तरीही एकही चोर फिरकला नाही. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. त्यामुळे या प्रकाराची चौकशी झाली. तेव्हा काही पोलिसांनीच त्यांच्या माहितीतील सोनसाखळी चोरांना या नव्या पद्धतीची कल्पना दिल्याची धक्कादायक बाब समोर आल्याचे एका वरिष्ठ निरीक्षकाने सांगितले.
हे पोलीस नेमके कोण होते याचाही आता आढावा घेतला जात आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.      

Story img Loader