पनवेल तालुक्यातील भिंगार्ली गावात गेले अनेक महिने राजरोस चालणाऱ्या कपल ऑर्केस्ट्रा बारवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी अचानक धाड टाकून ९० बारबालांची सुटका केली. यात ३२ अल्पवयीन मुलींचा समावेश असून ४३ ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या बारमधून एक कोटी १६ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या नाकाखाली या बारमध्ये गेले अनेक महिने धिंगाणा सुरू होता असे स्पष्ट दिसून येते.
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक संग्रामसिंग निशानदार, साहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल अहिरे यांनी पथकासह गुरुवारी रात्री आठच्या सुमारास भिंगार्ली गावातील कपल आर्केस्ट्रा बारवर धाड टाकली. पनवेल पोलिसांना या कारवाईचा थांगपत्ताही लागू दिला गेला नाही. एखाद्या पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शेजारच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे दिसून येते. या कारवाईचे आदेश थेट गृहमंत्रालयाकडून आल्याचे समजते. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांची विश्वासार्हता पुन्हा एकदा रसातळाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूहोती. या धाडीमध्ये पोलिसांना एक कोटी १६ लाख रुपये रोख रक्कम हाती लागली. बारवरील कारवाईत इतकी मोठी रक्कम जप्त करण्याची पोलिसांची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. रोख रकमेव्यतिरिक्त या धाडीत ७४१ गॅ्रम सोनेही पोलिसांनी जप्त केले.
पनवेल भागातील डान्स बारच्या अतिरेकाचा विषय विधानसभेत गाजल्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्स बारवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच पनवेल भागात आजही ऑर्केस्ट्राच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत बार सुरू राहत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. नवी मुंबई पोलिसांचा या सर्व बारना आशीर्वाद असल्याचे दिसून येते. कोपरखैरणे येथेही एक बार पहाटे उशिरापर्यंत सुरू असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा