पोलीस भरतीसाठी आलेल्या पाच तरुणांचा शारीरिक चाचणीनंतर मृत्यू झाल्यामुळे खडबडून जागे झालेल्या पोलीस दलाने यापुढे शारीरिक चाचणी संध्याकाळी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबईत घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी पोलीस सहआयुक्त सदानंद गोडसे यांची समिती नेमण्यात आली असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.
पोलीस भरतीवेळी मुंबईत चार तर ठाण्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्व स्तरांतून पोलीसांवर टीका करण्यात येऊ लागली. त्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने शारीरिक चाचणीच्या वेळात बदल केला असून, बाहेर गावाहून आलेल्या तरुणांची चाचणी तीन दिवसांच्या आत घेण्याचे निश्चित केले आहे. राकेश मारिया म्हणाले, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात मिळून २६०० जागांसाठी एकूण एक लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते. पुढील बंदोबस्ताचा विचार करता आम्हाला याच महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. या महिन्यात भरती प्रक्रिया केली नसती, तर ही प्रक्रिया प्रलंबित ठेवावी लागली असती, असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader