इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर अल्पवयीन मुलीचे मॉर्फ केलेले छायाचित्र तिचे कुटुंबिय व परिचित व्यक्तींना पाठवल्याप्रकरणी राजस्थानमधील २४ वर्षीय तरूणाविरोधात माहीम पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित १५ वर्षीय मुलीची इन्स्टाग्रामवर आरोपीसोबत ओळख झाली होती.
हेही वाचा >>> म्हाडाची सेवानिवासस्थाने मालकीहक्काने न देण्याचा निर्णय; २००९ मधील परिपत्रकानुसार कारवाई होणार
दोघांमध्ये चांगली मैत्री झाल्यानंतर त्यांचे नियमित बोलणे सुरू झाले. पण आरोपी अल्पवयीन मुलीला त्रास देऊ लागल्यामुळे कुटुंबियांनी राजस्थानवरून पीडित मुलीला मुंबईत मामाकडे पाठवले. त्यानंतर आरोपीने समाज माध्यमांवरून पीडित मुलीशी संपर्क साधत होता. तसेच त्याने पीडित मुलीच्या मामा व मामाकडे काम करणाऱ्या नोकराला दूरध्वनी करण्यास सुरुवात केली. तेवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने मुलीचे तंत्रज्ञानाच्या मदतीने अश्लील छायाचित्र तयार करून पीडित मुलीचा मामा व त्याच्या नोकराला पाठवले. या प्रकरणामुळे मुलीने नुकतीच माहीम पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार माहीम पोलिसांनी विनयभंग, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुरूवारी आरोपी तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला. तंत्रज्ञानाच्या मदतीने याप्रकरणी तपास सुरू आहे. आरोपीने या गुन्ह्यात किमान चार मोबाइल क्रमांकांचा वापर केला असून त्याद्वारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.