मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी वरळी परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरप्रकरणी महापालिकेने वरळी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून याप्रकरणी वरळी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. निवडणूक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी परिसराची पाहणी करून संबंधित बॅनरचे निष्कासन करून त्याबाबत अहवाल सादर करण्यास महापालिकेच्या जी-दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने ही तक्रार केली. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> पसंतीच्या वाहन क्रमांकाच्या वितरणातून वडाळा आरटीओच्या तिजोरीत ३० लाख रुपये महसूल जमा
शिवाजी पार्क येथे शुक्रवारी महायुतीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते. त्यामुळे पंतप्रधान येणाच्या मार्गावर वरळीत मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हार्दीक स्वागत, स्वागतोत्सुक एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर वरळीतील सासमीरा, पोद्दार जंक्शन, जे. के. कपूर चौक, ॲनी बेझंट रोड, तसेच खान अब्दुल गफार खान रोड परिसरात लावण्यात आले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची पाहणी केली.
हेही वाचा >>> अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार सभेत दगडफेक, दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
वरळीत बेकायदा बॅनर, झेंडे व पोस्टर्सवर तात्काळ कारवाई करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचना निवडणूक अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या जी दक्षिण विभागाला केली होती. वरळी परिसरात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात बॅनर, झेंडे, पोस्टर्स लावण्यात आल्याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित देशमुख यांनी जी दक्षिण विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना परिसरातील बॅनर्सवर नियमित निष्कासनाची कारवाई करून त्याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. महापालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरळी परिसरात पाहणी केली. त्यानुसार संबंधित बॅनर याप्रकरणी वरळी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. वरळी पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व राजकीय बॅनर्स काढण्याबाबतचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिले होते. त्यानंतरही मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने बॅनर अथवा फलक लावण्यात आल्यास ते निष्कासीत करावेत. तसेच प्रसंगी मालमत्ता विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.