मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची एक्स हँडलवर धमकी दिल्याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी पहाटे ही धमकी प्राप्त झाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. घटनेनंतर दोन विमाने मुंबई विमानतळावरच थांबवून त्यांची तपासणी करण्यात आली. तर न्यूयॉर्कला जाणाऱ्यांसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. धमकीसाठी दोन एक्स हँडलचा वापर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई विमानतळावरील ६ ई१२७५ व ६ ई५७ या दोन इंडिगो कंपनीच्या विमानात तसेच न्यूयॉर्कसाठी उड्डाण घेतलेल्या एआय ११९ विमानांमध्ये बॉम्ब असल्याचे ट्वीट फैजलुद्दीन६९ व फैजलुद्दीन२७०७७ या दोन एक्स प्रोफाईलद्वारे पाठवण्यात आले होते. इंडिगा व एअर इंडियाच्या एक्स हँडलवर संबंधित ट्वीट प्राप्त झाल्यानंतर तात्काळ याबाबतची माहिती विमानतळ प्राधिकरणाला देण्यात आली. याबाबत मुंबई पोलिसांना तसेच संबंधित यंत्रणांना कळण्यात आले. त्यानंतर तात्काळ बैठक घेऊन ६ ई१२७५ व ६ ई५७ दोन्ही विमाने मुंबई विमानतळावर थांंबवण्यात आली. एअर इंडियाच्या विमानाने न्यूयॉर्कला जाण्यासाठी उड्डाण घेतले होते. वैमानिकाशी संपर्क साधून विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आले. तेथे सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांना विमानातून सुखरूप उतरवून विमानाची तपासणी करण्यात आली.

हे ही वाचा…Byculla Vidhan Sabha : विधानसभेला भायखळा मतदारसंघात कोण बाजी मारणार? महाविकास आघाडी की महायुती?

मुंबई पोलिसांनाही याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विमातळावर धाव घेतली. पण त्यापूर्वीच केंद्रीय सुरक्षा विभागाला याबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी बैठक घेऊन तात्काळ दोन विमाने थांबवली व एका विमानाला दिल्लीच्या दिशेने वळविले. सुरक्षेच्या दृष्टीने योग्यती काळजी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी सहार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३५१(४), ३५३(१)(ब), अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत पालव यांच्या तक्रारीवरून धमकी व प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये बाधा आणल्याबाबत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एक्स(ट्वीटर) कंपनीला ई-मेल पाठवून फैजलुद्दीन६९ व फैजलुद्दीन२७०७७ या दोन एक्स हँडल वापरकर्त्यांची माहिती मागितली आहे. दोन्ही एक्स हँडल वापरणारी व्यक्ती एकच असल्याचा संशय आहे. त्याद्वारे तपास सुरू आहे. प्रवशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोमवारी योग्य ती काळजी घेण्यात आली होती. विमानांच्या तपासणीत काहीच आढळले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. एअर इंडियाचे विमान न्यूयॉर्कला जाणार होते. तर इंडिगोचे एक विमान मस्कत व दुसरे जेद्दाहला जाणार होते