मुंबई: कर्ज वसुली करणाऱ्या मुलुंडमधील एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने त्यांच्याकडील ८५ हजारांची रक्कम दोघांनी चोरल्याचा बनाव केला होता. मात्र मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता या कर्मचाऱ्यानेच हा बनाव रचल्याचे समोर आले असून त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
अमित गुप्ता (२१) असे या आरोपीचे नाव असून तो भांडुप परिसरातील राहणारा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो कर्ज देणाऱ्या मुलुंडमधील एका कंपनीत काम करत आहे. २० जानेवारीला वसूल केलेले ८५ हजार रुपये घेऊन तो मुलुंडमधील कार्यालयात येत होता. मात्र रस्त्यात दोघांनी अडवून आपली बॅग पळवल्याचा बनाव त्याने रचला होता. ही माहिती त्याने वरिष्ठांना दिल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून त्याने याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी देखील तत्काळ यामध्ये गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.
मात्र तपासात आरोपीच बनाव करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आपणच चोरीचा बनाव केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.