मुंबई : पवई परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यान पोलीस आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांवर स्थानिक रहिवाशांनी दगडफेक केल्याची घटना गुरूवारी घडली. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या जमावाने तेथील महिलेच्या घरावरही हल्ला केल्याचा आरोप असून त्यात एक तीन वर्षांची मुलगी जखमी झाली. त्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगिगतले. याप्रकरणी आतापर्यंत ५० हून अधिक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय १५ महिलांना नोटीस देण्यात आली आहे.
हेही वाचा >>> राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, मुंबईत अतिवृष्टीचा इशारा
पवईच्या जय भीम नगर भागात पालिकेच्या एस विभाग कार्यालयामार्फत अतिक्रमण हटवण्याबाबत ३ जून रोजी नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार पालिका अधिकारी, कर्मचारी ६ जून रोजी दुपारी १ वाजता सदर ठिकाणी पोहोचले. यासाठी पवई पोलिसांकडून पालिकेने मागितलेला बंदोबस्तही पुरविण्यात आला होता. मात्र याच वेळी पोलिसांवरच स्थानिकांनी दगडफेक करायला सुरुवात केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी दगड फेक सुरूच ठेवल्याने पोलिसांना अखेर सौम्य लाठीचार्जही करावा लागला. या घटनेचे चित्रीकरण समाज माध्यमांवर वायरल झाले होते. घटनेनंतर तत्काळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पवई पोलिसांनी संबंधितांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ५० हून अधिक जणांना अटकही केली. याशिवाय १५ आरोपी महिलांना सीआरपीसी अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. याशिवाय परिसरात राहणाऱ्या महिलेने बांधकाम व्यवसायिकासोबत समझोता केल्याच्या आरोपखाली जमावाने आशा चौरे या महिलेच्या घरावरही दगडफेक केली. त्यात चौरे यांच्या बहिणीच्या तीन वर्षांच्या मुलीला दगड लागल्यामुळे ती जखमी झाली. याप्रकरणी पवई पोलिसांनी २८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी दगड व लाठ्याकाठ्यांनी महिलेच्या घरावर हल्ला केला असून त्या हस्तगत करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.