सार्वजनिक सुट्टीमुळे गोपाळ कृष्ण गोखले पुल परिसरातील वाहतुक मंगळवारी सुरळीत होती, परंतु या ठिकाणचे वाहतुक नियोजन करण्यासाठी वाहतुक पोलिसांनी विविध उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. तसेच याबाबत वाहतुक पोलिसांनी महापालिकेला पत्र लिहून विविध मागण्या केल्या आहेत. तसेच पुढील सहा महिन्यात पुलाच्या एका बाजूचे काम करण्याबाबतची विनंती करण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.
वाहतुक पोलिसही वाहतुक नियमानासाठी विविध उपाययोजना करत आहेत. आम्ही महापालिकेला पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण करून पुलाची एक बाजू सुरू करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे वाहनचालकांनाही मोठा दिलासा मिळेल, असे वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> मुंबई: ‘मेट्रो १’ची प्रवासी संख्या वाढली; प्रवासी का वळले मेट्रोकडे…नेमके कारण जाणून घ्या…
पूल बंद झाल्यामुळे या परिसरातील वाहतुकीचा पुढील सहा ते सात दिवस अभ्यास करण्यात येणार आहे. आम्ही सतत रहदारीच्या स्थितीवर लक्ष ठेवत आहोत आणि वाहनांची संख्या कधी वाढते आणि कधी कमी होते हे समजून घेण्यासाठी अभ्यास करत आहोत. आम्ही आमच्या अभ्यासाच्या आधारे विशिष्ट ठिकाणांवर, विशेष वेळेला किती वाहतुक पोलीस तैनात करायचे याचे नियोजन करता येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय एसव्ही रोड आणि लिंक रोडवर रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने तेथून हटवण्यास सांगितले आहे. त्याशिवाय वाहनांवर कारवाईलाही सुरूवात केली आहे. डीएन नगर, जोगेश्वरी, ओशिवरा, सहार, वाकोला, सांताक्रूझ आणि गोरेगाव हे वाहतुक शाखेच्या सात विभागांवर ताण वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक विभागात १० ठिकाणे आहेत. त्याठिकाणी किमान दोन अतिरिक्त माणसांची आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेला पत्र लिहून २०० वाहतुक वॉर्डन देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. तसेच इतर विभागांतून या सात पोलीस चौक्यांना अतिरिक्त कुमक पुरवण्यात आली आहे. तसेच परिसरातील फेरवाल्यांवर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवणे, पदपथावरंची रुंदी कमी करणे आदी मागण्याही वाहतुक पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.