शरीरविक्रयाच्या विळख्यात अडकलेल्या दोन महिलांची समाजसेवा शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री गोरेगावच्या ओबेरॉय मॉल येथून सुटका केली. दोघींपैकी एक मॉडेलिंगच्या क्षेत्रात स्थान मिळविण्यासाठी धडपडत असून दुसऱ्या महिलेला कल्याणहून आणण्यात आले होते. पोलिसांनी एका आरोपीला अटक केले असून फरार झालेल्या दोन मध्यस्थांचा शोध घेत आहेत.
खबरींकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती वेश्याव्यवसायासाठी महिला पुरवितो अशी माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गोरेगाव (पू.) येथील ओबेरॉय मॉल येथे रात्री अकराच्या सुमारास पाळत ठेवली होती. त्या वेळी एका गाडीतून ३१ वर्षीय महिलेला घेऊन काही पुरुष आले. पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकांना त्यांच्याशी बोलायला पाठवले असता, आणखी महिला आहेत का, असे विचारल्यावर त्यांनी २६ वर्षीय तरुणीला आणले. दोन्ही महिलांना आणले असता पोलिसांनी छापा टाकून दोन्ही महिलांची सुटका केली तर त्यांना आणणाऱ्या गाडीच्या चालकाला पकडले मात्र, दोन्ही मध्यस्थ पसार झाले. महिलांमधील एक पत्नीपासून विभक्त झाली असून ती कल्याणला राहते तर दुसरी तरुणी सहा महिन्यांपूर्वी मुंबईत मॉडेलिंगच्या क्षेत्रात उमेदवारी करण्यासाठी आल्याचे पोलिसांना कळाले.
मसाज पार्लरवर छापा
मसाज पार्लरच्या नावाखाली अश्लील कृत्ये चालणाऱ्या वांद्रे पश्चिम येथील हेल्थकेअर स्पावर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने सोमवारी रात्री कारवाई केली. कारवाई पोलिसांनी चार महिलांची सुटका केली आहे. समाजसेवा शाखेला या स्पामध्ये वेगळा विभाग करून ग्राहकांशी मालिश करण्याच्या नावाखाली अश्लील चाळे केले जात असल्याची माहिती मिळाली होती. सोमवारी रात्री शाखेच्या पथकाने या स्पामध्ये प्रवेश करत बनावट ग्राहक असल्याचे भासवले. त्या वेळी उपस्थित तीनही महिला मालिशच्या नावाखाली अश्लील कृत्ये करताना आढळल्या. पोलिसांनी पाठविलेल्या बनावट ग्राहकाने तीनही महिला समाधानकारक नसल्याचे सांगितल्यावर स्पाची व्यवस्थापकही या कृत्यात सहभागी झाली. या चारही महिलांची सुटका शाखेने केली आहे.
मायलेकीला मारहाण
नोकरी मिळवून देणाऱ्या कंपनीकडे ६५० रुपये परत मागण्यासाठी गेलेल्या मायलेकीला कंपनीतील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना अंधेरी येथे उघडकीस आली आहे. डी. एन. नगर पोलिसांनी या प्रकरणी कंपनीचा मालक आणि कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मायलेकींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सायली धुर्वे हिने एक्स्पर्ट मॅनेजमेंट या नोकरी लावून देणाऱ्या कंपनीत नोकरी मिळवून देण्यासाठी ६५० रुपये भरले होते. आठवडा उलटूनही या कंपनीने सायलीला काही प्रतिसाद दिला नाही. त्या विषयी चौकशी केली असता, तुम्हाला प्रशिक्षण देण्याची गरज असून त्यासाठी आणखी पैसे लागतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र, सायलीने पैसे देण्यास नकार देत, पूर्वी भरलेले ६५० रुपये परत घेण्यासाठी आईसह कंपनी गाठली. परंतु त्या वेळी कंपनीचा मालक आणि कर्मचारी यांच्यासोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर त्यांनी मायलेकींना धक्काबुक्की करीत मारहाण केली. यात सायलीच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. तिच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कंपनीचा मालक आणि कर्मचाऱ्याविरोधात डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा