कांदिवलीतील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सापडलेल्या नवजात बालिकेच्या आईचा शोध घेण्यात समतानगर पोलिसांना यश आले आहे. नोकरीचे आमीष दाखवून नातेवाईकानेच तरूणीवर बलात्कार केला आणि त्यामुळे गरोदर झालेल्या तरूणीने या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच बालिकेला जन्म दिला. दरम्यान, तरूणीने नवजात बालिकेला तेथेच टाकून पलायन केल्याची कबुली पोलिसांना दिली. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी २६ वर्षीय आरोपीविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कांदिवलीतील मेट्रो रेल्वे स्थानकाजवळील अशोकनगर, सुमो किंग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नवजात बालिकेला टाकण्यात आल्याची माहिती २७ ऑक्टोंबर रोजी समतानगर पोलिसांना मिळाली.
हेही वाचा >>> मुंबई:घर भाड्याने देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारा तोतया सैनिक अटकेत
समतानगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या बालिकेला तातडीने उपचारासाठी कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलिसांनी या बालिकेच्या आईचा शोध सुरू केला होता. सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रकरणाच्या माध्यमातून एका १८ वर्षांच्या तरूणीला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. ही नवजात बालिका आपली असल्याचे, तसेच प्रसूतीनंतर बाळाला तेथे टाकून आपण पळून गेल्याचे तिने चौकशीत कबुल केले. ही तरूणी मूळची उत्तर प्रदेशमधील रहिवाशी असून ती तिच्या आईसोबत कांदिवलीतील समतानगर परिसरात वास्तव्यास आहे. दोन वर्षांपूर्वी तिचा नातेवाईक उत्तर प्रदेशातून मुंबईत आला होता. मुंबईत राहण्याची व्यवस्था करण्याचे, तसेच नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. त्यातून ती गरोदर राहिली होती. आरोपी २६ ऑक्टोबर रोजी या तरूणीला घेऊन अशोकनगर, सुमो किंग इमारतीजवळ आला होता. त्याने तिला ११ व्या मजल्यावर नेण्याचा प्रयत्न केला, मात्र पहिल्या मजल्यावरच तिने या बालिकेला जन्म दिला. यामुळे तो प्रचंड घाबरला आणि तेथून पळून गेला. त्यानंतर पीडित तरूणीही बाळाला येथेच सोडून पळून गेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी उत्तर प्रदेशात पळाल्याचा पोलिसांना संशय आहे.