कल्याणमधील चार युवक बेपत्ता होण्यामागील कारणांचा शोध घेणाऱ्या राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाला दोघा अफगाण नागरिकांचा संशय आला असला, तरी त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळविण्यात, तसेच त्यांचा भारतातील वास्तव्याचा नेमका उद्देश उघड करण्यात यश आलेले नाही. या दोन्ही अफगाणींची ओळख पटली असली, तरी त्यांच्या व्हिसावरून त्यांचा नेमका हेतू अधिक स्पष्ट करता आलेला नाही, अशी कबुली एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र तरीही या दोन अफगाणींच्या कार्यपद्घतीबद्दल अधिक माहिती काढणे सुरूच आहे.
संबंधित चार युवकांना चिथावण्यात आल्यामुळेच ते इराकमधील दहशतवादी संघटनेला जाऊन मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. ठाणे पोलिसांसमवेत राज्याच्या दहशतवादविरोधी विभागानेही समांतर तपास सुरू केल्यानंतर दोघा अफगाणींची नावे पुढे आली. रतेब आणि रेहमान दौलती अशी त्यांची नावे आहेत. यापैकी रतेबने कल्याणमधीलच एका १७ वर्षे वयाच्या तरुणीशी विवाह केला. तिला घेऊन तो अफगाणिस्तानात गेला. त्याची पहिली पत्नी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
हे दोन्ही अफगाणी नागरिक अनेक तरुणांच्या संपर्कात होते, हे स्पष्ट झाले असून. केवळ चारच तरुण आतापर्यंत गेले आहेत की ती संख्या अधिक आहे, याचाही शोध घेतला जात आहे. मात्र त्याबाबत अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र या अफगाणींनी कशा पद्धतीने तरुणांना चिथावले, याबाबतची माहितीही तपासात मिळू शकलेली नाही.

Story img Loader