कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड अरूण गवळी याची भेट घेतल्याबद्दल मुंबईतील जे जे मार्ग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयांनी अभिनेता अर्जुन रामपाल याला नोटीस बजावली आहे. न्यायालयाची पूर्वपरवानगी न घेता गवळीची भेट घेतल्यामुळे रामपाल अडचणीत येण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी दैनिकात हे वृत्त देण्यात आले आहे.
‘डॅडी’ या आगामी चित्रपटात रामपाल गवळीची भूमिका साकारतो आहे. त्यापार्श्वभूमीवर गेल्यावर्षी २९ डिसेंबरला रामपाल याने मुंबईतील रुग्णालयाच्या एका वॉर्डमध्ये गवळीची भेट घेतली. गवळीला नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळीच रामपाल याने गवळीची भेट घेऊन त्याच्याशी चर्चा केली. गवळीला तळोजा कारागृहातून त्या दिवशी रुग्णालयात घेऊन जाणाऱया पोलीसांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येबद्दल न्यायालयाने गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Story img Loader