मुलुंड येथे गोणीत आढळलेल्या प्रतिक्षा भोजने या महिलेच्या हत्येचे गूढ उकलण्यात मुलुंड पोलिसांना यश आले असून भोजने यांच्या शेजारी राहणाऱ्या रवींद्र माने (६२) यांनी ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
२२ जानेवारी रोजी मुलुंडच्या नेताजी सुभाष रस्त्यावर एका गोणीत प्रतिक्षा भोजने (३२) या महिलेचा मृतदेह आढळला होता. मुलुंड पोलिसांनी तिची ओळख पटवल्यानंतर तपास सुरू केला.  घाटकोपरच्या भटवाडी येथे राहणारी प्रतिक्षा ही विधवा होती. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला.  भोजने यांच्या शेजारी राहणारे रवींद्र माने यांच्यावर पोलिसांचा संशय होता. माने मात्र काही दाद लागू देत नव्हते. अखेर महिला पोलिसांनी माने याची विवाहित मुलगी साक्षी खाडे हिला विश्वासात घेऊन तपास सुरू केल्यावर खुनाचे गूढ उकलले. माने आणि प्रतिक्षा यांचे संबंध होते. मयत महिला मानेकडे सातत्याने पैसे मागत होती. त्यावरुन झालेल्या भांडणातून माने यांनी प्रतिक्षाची हत्या केली.  हत्या केल्यानंतर मुलगी साक्षी आणि जावई संतोष खाडे यांच्या मदतीने त्यांनी प्रतिक्षाचा मृतदेह गोणीत भरून मुलुंड येथे फेकून दिला होता. पोलिसांनी रवींद्र माने, त्यांची मुलगी साक्षी खाडे आणि जावई संतोष खाडे या तिघांना अटक केल्याचे परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त महेश धुरये यांनी सांगितले. आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.