भविष्यात कधी आण्विक, जैविक वा रासायनिक हल्ले झालेच तर त्याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलात एक स्वतंत्र पथक तयार करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. नागरी दहशतवादाविरोधी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचाही विचार आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा गटाच्या (एनएसजी) धर्तीवर राज्य सरकारने ‘फोर्स वन’ या नावाने विशेष कमांडो पथकाची स्थापना केली. २६ नोव्हेंबरला या हल्ल्याच्या घटनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर गृहमंत्र्यांनी शनिवारी ‘फोर्स वन’ पथकाच्या तयारीचा आढावा घेतला. या वेळी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना कमांडोंकडून केल्या जाणाऱ्या कामगिरीवर आधारित विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. जागतिक दर्जाचे उत्तम प्रशिक्षण आणि अत्याधुनिक शस्त्रांनी परिपूर्ण फोर्स वन कमांडो पथकाच्या दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या सुसज्जतेबद्दल पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
कलिना येथे फोर्स वन मुख्यालयात गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी फोर्स वनचे प्रमुख रजनीश सेठ, पोलीस अधिक्षक डॉ. विनय राठोड, दत्ता शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. फोर्स वन पथकात किमान पाच वर्षे काम केल्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या जातील. एखाद्याने स्वतच्या जिल्ह्यात बदली मागितली तरी ती दिली जाईल, त्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.