ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ानुसार रस्ते तयार करावेत, या मागणीसाठी रेल रोको आंदोलन करण्याच्या तयारीत असणारे कळवा-मुब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार आनंद परांजपे यांचा बेत सोमवारी सतर्क असलेल्या रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला. रस्त्यांच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी ८ वाजता आव्हाड आणि त्यांचे समर्थक रेल रोको करण्याचे तयारीत होते. खासदार परांजपे हेही रेल्वे प्रवाशांना वेढीस धरू पाहणाऱ्या या आंदोलनात सहभागी होणार होते, मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी कळवा रेल्वे मार्गालगत सुमारे दोन हजारांची फौज उभी केली आणि आंदोलकांना हात हलवत परतावे लागले.
आव्हाड व परांजपे यांनी  कळवा परिसरात जागोजागी रेल रोकोचे फलकही उभारले होते. रस्ते उभारावेत, या मागणीसाठी महापालिकेला धारेवर धरण्याऐवजी रेल रोको करून प्रवाशांना वेठीस धरण्याचा आव्हाडांच्या मनसुब्यांविषयी सर्वत्र नाराजीचा सूर होता. यापूर्वीही रेल्वे गाडय़ा अडवून प्रवाशांना वेठीस धरणारे ‘आव्हाड तंत्र’ चांगलेच अवगत असल्यामुळे पोलिसांनी सोमवारी पहाटेपासूनच ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या रेल्वे मार्गाभोवती सुरक्षेचे मोठे कडे उभे केले होते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोठा जमाव रेल्वे रोखण्यासाठी येत असताना त्यांना तेथील स्थानिक नगरसेवकांच्या कार्यालयाच्या जवळच पोलिसांनी या जमावास रोखले. तसेच त्यांना रेल रोको करण्यास मज्जाव केला. पोलिसांच्या या फौजफाटय़ासमोर जमावाचे काहीच चालेना. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी पोलिसांशी बाचाबाची करण्याचा प्रयत्न केला. आव्हाडांचे आणि कळवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये या वेळी जोरदार खडाजंगी झाली. अखेर महापालिकेकडे निवेदन देऊ, असे म्हणत परतण्याची नामुश्की या आंदोलकांवर आली. त्यामुळे हे आंदोलन पूर्णपणे अयशस्वी ठरले. रेल्वे पोलिसांनी कळवा परिसरातील बंदोबस्त रात्री उशिरापर्यंत कायम ठेवला होता.

Story img Loader