विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी पोलिसांवर त्यांच्याशी संवाद साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी मंगळवारी ठाणे शहराला भेट दिली. यावेळी शहरातील विविध ठिकाणी जाऊन आबांनी ज्येष्ठ नागरिकांशी मोकळेपणाने संवाद साधला आणि राज्याचे पोलीस दल त्यांच्या पाठीशी असल्याचा दिलासा दिला.
गेल्या काही वर्षांपासून नोकर तसेच सुरक्षारक्षकांकडून चोरीच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होऊ लागले आहेत. त्याच पाश्र्वभूमीवर ज्येष्ठ नागरीकांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्यासंबंधीचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिसांना दिले होते. दरम्यान, या संबंधीची जबाबदारी पोलिसांकडून चोखपणे पार पाडली जाते का, याचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री पाटील मंगळवारी अचानक ठाण्यात आले
ठाणे येथील कोपरी परिसरातील न्यू आनंद सोसायटीमध्ये राहणाऱ्या राधाकृष्ण अय्यर यांच्या घरी भेट दिली. या भेटीदरम्यान पाटील यांनी अय्यर यांच्याशी मुक्तपणे संवाद साधत पोलीस अधिकारी व कर्मचारी तुमच्या घरी येतात का, तुमची मदत करतात का, तुम्हाला सुरक्षित असल्यासारखे वाटते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. त्यावेळी स्थानिक पोलिसांकडून आम्हाला चांगली मदत मिळते तसेच कधी औषध आणून देतात तर कधी घरगुती कामेही करतात, असे अय्यर यांनी सांगितले. पोलीस वारंवार घरी येऊन विचारपूस करत असल्याने आम्हाला त्यांचा आधार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पाटील यांनी नौपाडा भागातील शकुंतला सोसायटीमध्ये राहणारे जयवंत शिंदे (८६)आणि त्यांची पत्नी आशा शिंदे यांचीही भेट घेऊन विचारपूस केली. तर वागळे इस्टेट भागातील रहेजा कॉम्पलेक्समध्ये राहणारे सदानंद उपाध्याय आणि त्यांच्या पत्नीची त्यांनी भेट घेऊन पोलिसांच्या कामाचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान, कॉम्पलेक्सजवळ चोरटय़ांनी माझ्या गळ्यातील मंगळसुत्र चोरले होते. मात्र, पोलिसांनी शोध घेऊन त्या चोराला पकडले, अशी माहिती सदानंद यांच्या पत्नीने त्यांना दिली.
या सर्वानी सोसायटीमार्फत ज्येष्ठ नागरीकांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली या भेटीदरम्यान, पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना आबांनी काही महत्वाच्या सुचना केल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा