विक्रोळी येथील अनधिकृत बांधकाम तोडायला गेलेल्या पालिकेच्या पथकावर स्थानिक रहिवाशांनी दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाला. पार्कसाइट पोलिसांनी याप्रकरणी १५ आरोपींना अटक केली.
सुभाष नगर येथील गडवाली चाळ येथे असलेले अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी पालिकेचे पथक मंगळवारी दुपारी गेले होते. त्यावेळी तेथील रहिवाशांनी कर्मचाऱ्यांना धमकी देत दगडफेक केली. घटनास्थळावर गेलेले पोलीस उपनिरीक्षक कपिल सोनुकांबळे हे दगडफेकीत जखमी झाले. त्यांच्यावर विक्रोळीच्या महात्मा फुले रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी एकूण १५ जणांना अटक करून त्यांच्यावर दंगल माजविणे आणि सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.