नवी मुंबईतील बिल्डर सुनील लोहरिया यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश बिजलानी आजारपणाचा बनाव करून ठाणे शासकीय रुग्णालयात गेल्या तीन आठवडय़ांपासून पंचतारांकित सुविधा उपभोगत आहे. मात्र याची जाणीव असतानाही त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात काही अंशी अपयश आल्याची कबुली मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी उच्च न्यायालयात दिली. पोलिसांनी ही बाब प्रतिज्ञापत्राद्वारे कबूल करण्याचे आणि तपासाची सूत्रे हाताळणाऱ्या उपायुक्ताने प्रकरणाच्या सर्व कागदपत्रांसह पुढील सुनावणीच्या वेळी न चुकता हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
लोहारिया याचा मुलगा संदीप याने ठाणे सत्र न्यायालयाने बिजलानीला रुग्णालयात दाखल करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
न्या.एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळी या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून एकाची खातेनिहाय चौकशी सुरू असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. तर बिजलानीचा परत ताबा मिळविण्यात आपण कमी पडल्याचेही कबूल करण्यात आले. त्यावर न्यायालयाने कारागृह नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त करून पोलिसांना सुनावले.

Story img Loader