मुंबई : अंधेरीमधील नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चार भावडांना मध्य प्रदेशमधून शोधून काढण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.

या चार भावंडांनी २६ मे रोजी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. या भावंडांनी घर सोडून मध्य प्रदेशच्या दिशेने धाव घेतली होती. गेल्या नऊ दिवसांपासून चार भावंडे बेपत्ता होती. मुले बेपत्ता झाल्यावर त्यांच्या मामांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी बेपत्ता मुलांचे मित्र-मैत्रिणी आणि सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या मदतीने तपास सुरू केला. त्यानंतर ही मुले मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथे एका अनोळखी व्यक्तीसोबत दिसले. पोलिसांनी ग्वाल्हेर रेल्वे स्थानक परिसर आणि शहरातील ८० पेक्षा अधिक सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी केली. ही सर्व मुले त्या अनोळखी व्यक्तीसोबत माधव बालनिकेतन आश्रमात असल्याचे समजले.

हेही वाचा – वेळेत खड्डे न भरणाऱ्या अभियंत्यांना प्रतिदिन हजार रुपये दंड करावा, भाजपच्या माजी नगरसेवकाची मागणी

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पोलीस सज्ज

स्थानिक पोलिसांची मदत घेऊन एमआयडीसी पोलिसांचे पथक आश्रमात पोहोचले. भावंडांपैकी सर्वात मोठ्या मुलीने आश्रमात लेखी अर्ज देऊन तेथे राहण्याची सोय करण्याची विनंती केली होती. तसेच वडील घेऊन जाण्यास आल्यास त्यांना आमचा ताबा देऊ नये, असेही सांगितले होते. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या पथकाने या चारही भावंडांना २ जून रोजी ताब्यात घेऊन ग्वाल्हेर येथील बालकल्याण समिती समोर हजर केले. त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्याची कार्यवाही सुरू केली. या भावंडांकडे संपर्काचे कोणतेही साधन नसताना तपास पथकाने कौशल्य वापरून तीन मुली व एका मुलाचा शोध घेतला.