वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या राम कदम आणि क्षितिज ठाकूर या आमदारांची सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी काढून घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.
या आमदारांना प्रत्येकी दोन शस्रधारी पोलिसांचा बंदोबस्त होता. परंतु मारहाण प्रकरणानंतर आढावा घेऊन या आमदारांचे संरक्षण काढून घेण्याचे आदेश जारी करण्यात आल्याचे कळते.
सूर्यवंशी यांना विधानभवनात मारहाण केल्याबद्दल कदम आणि ठाकूर या दोन आमदारांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. या दोघांची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र कदम यांच्यावरील आणखी काही गुन्हे पोलिसांनी उकरून काढले आहेत. साधारणत: एखाद्या गुन्ह्य़ात अटक झाल्यास संबंधितांची सुरक्षा व्यवस्था काढली जाते.
या दोन्ही आमदारांच्या अटकेचा अहवाल मिळाल्यानंतर नियमाप्रमाणे त्यांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.
या घटनेच्या निमित्ताने आमदार विरुद्ध पोलीस खाते असा संघर्ष निर्माण झाला होता. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी अधिवेशनात सूर्यवंशी यांच्या निलंबनाची मागणी लावून धरल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ती मान्य करावी लागली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा