लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : दादर रेल्वे स्थानकात रक्तबंबाळ अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाच्या तपासासाठी पायधुनी पोलिसांना सांकेतिक भाषेचे धडे गिरवावे लागले. मृत अर्शद शेखच्या हत्येतील बहुसंख्य साक्षीदार, आरोपी मूकबधीर असल्यामुळे सांकेतिक भाषा आत्मसात करून पोलिसांनी सुमारे ३०० पानांचे आरोपपत्र तयार केले. त्यात ३१ मूकबधीर साक्षीदारांची साक्ष समाविष्ट करण्यात आली आहे.

या हत्या प्रकरणातील मृत व्यक्ती, आरोपी व साक्षीदार सर्वच मूकबधीर असल्यामुळे पोलिसांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. याप्रकरणी सुरुवातीला दुभाषकाची मदत घेण्यात आली. पण पुढे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनीच स्वतः मूकबधीर आरोपींची सांकेतिक भाषा शिकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पोलिसांनी सांकेतिक भाषेच्या अनेक चित्रफीत पाहिल्या. पाच पोलीस पथकांनी अहोरात्र या गुन्ह्याचा तपास करून ३०० पानांचे आरोपपत्र तयार केले.

आणखी वाचा-व्यथा पोलिसांच्या : घर व सेवा वसाहतींचा प्रश्न रखडलेला

अर्शद शेख (३३) याची त्याचा मित्र जय पवन चावडा (३२) आणि शिवजीत सिंह (३४) यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी पायधुनीमधील एका घरात हत्या केली. त्यांनी हातोडा आणि फुटलेल्या बिअरच्या बाटल्यांनी शेखचा खून केला आणि त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरला. दोघांनी शेखचा मृतदेह ठेवलेली बॅग दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ११ वरील रेल्वेतून नेण्याचा प्रयत्न केला, परंतु रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना पकडले. नंतर शेखची पत्नी रुकसाना हिलाही याप्रकरणी अटक करण्यात आली.

जगपालप्रीत सिंह (५०) याचाही गुन्ह्यांतील सहभाग उघडकीस आला. तो मूळचा पंजाबमधील रहिवासी असून मूकबधीर आहे. सध्या तो बेल्जियममध्ये आहे. याप्रकरणी नोटिस जारी करण्यात आली असून, या गुन्ह्यातील त्याची भूमिका समजून घेण्यासाठी इंटरपोलबरोबर संपर्क साधण्यात आला आहे. चावडा हा हत्येतील मुख्य आरोपी होता. आरोपी व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकांशी संपर्क साधायचे. अशा १० चित्रफिती पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यापैकी दोन चित्रफितींमध्ये पोलिसांना हत्येसंबंधी माहिती मिळाली. गुन्ह्यांच्या तपासासाठी दुभाषांचे निरीक्षण करून पोलीस सांकेतिक भाषा शिकले. पोलिसांना त्याचा सरावही करावा लागला.

आणखी वाचा-गोवंडीतील शिवाजी नगरमधील हवा आजही ‘वाईट’, वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण वाढले

चावडा आणि सिंह यांनी शेखला ५ ऑगस्ट रोजी पायधुनी परिसरात बोलावले. नंतर तिघेही चावडाच्या पायधुनीतील घरी गेले. तेथे चावडाने सिंहला बिअर दिली. रागाच्या भरात चावडा आणि सिंह यांनी शेखचा गळा आवळला आणि नंतर हातोड्याने त्याचा खून केला आणि त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरला. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी चावडाने नियोजन केले होते. परंतु दादर रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले. त्याचवेळी सिंह त्याच्या टिटवाळ्यातील घरी गेला. ही हत्या पूर्वनियोजित होती. त्याने दोन दिवस आधीच आपल्या विरारमधील घरातून बॅग आणली होती. चावडाचे शेखच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. त्यातून ही हत्या झाली. पोलिसांना एक व्हिडिओ सापडला असून त्यात जगपालप्रीत चावडा आणि सिंहला पारपत्र आणि पैसे दाखवत होता. या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, जगपालप्रीतने एका व्हॉट्स ॲप समुहात पोस्ट केले होते. ‘शेखला ठार मारण्यास आपण सांगितले नव्हते, फक्त त्याला धडा शिकवण्यास सांगितले होते’, असे त्या पोस्टमध्ये म्हटले होते. पोलिसांनी व्हिडिओचे भाषांतर करण्यासाठी दुभाषकाची मदत घेतली.