आपल्या वर्गमैत्रिणीचा विनयभंग केल्याच्या कथित आरोपाप्रकरणी एका पाच वर्षांच्या मुलाला पोलीस ठाण्यात नेऊन त्याची चौकशी केल्याच्या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली. एवढेच नव्हे, तर या प्रकरणाचे जनहित याचिकेत रूपांतर करून घेत या प्रकरणाचा अहवाल एक आठवडय़ात सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
डिसेंबर महिन्यात या घटनेबाबत डॉ. के. पी. आशू मुकुंदन (सेंटर ऑफ क्रिमिनॉलॉजी अॅण्ड जस्टिस अॅण्ड डायरेक्टर वुईथ द रिसोर्स सेल फॉर ज्युविनाइल जस्टिस) यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीना पत्रव्यवहार केला होता आणि पाच वर्षांच्या मुलाला पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केल्याची बाब त्याद्वारे निदर्शनास आणून दिली होती. त्या पत्राची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठाने बुधवारच्या सुनावणीत पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर केले.
घटनेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मुलीच्या आईवडिलांनी विनयभंगाची तक्रार नोंदवल्यावर अॅन्टॉप हिल येथील शाळेत शिकणाऱ्या या मुलाला पोलिसांनी शाळेतून पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर त्याची चौकशी केली. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) आणि बालगुन्हेगारी संबंधित कायद्यातील गुंतागुंतीचा संदर्भ देत हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेण्याचे प्रो. मुकुंदन यांनी पत्रात म्हटले आहे. शिवाय भारतीय दंडविधानाच्या कलम ८२ नुसार, सात वर्षांखालील मुलाने केलेला अपराध हा गुन्हा मानला जात नाही, याकडेही त्यांनी पत्रात लक्ष वेधले आहे. घटनेबाबत कळल्यानंतर मुलाचे आईवडील आणि त्याच्या वर्गमित्राशी संवाद साधला असता संबंधित मुलीवर तिला झालेल्या जखमांवर लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे उघड झाले. त्यामुळे या गुन्ह्य़ामध्ये एका प्रौढ व्यक्तीच्या समावेशाची दाट शक्यता आहे. तसेच एका पाच वर्षांच्या मुलाला या प्रकरणात गोवून खऱ्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. हे खूप गंभीर प्रकरण असून पोलिसांमध्ये लहान मुलांप्रती वागण्याबाबत ठोस संदेश जाण्याची तसेच मुलांप्रती त्यांनी कसे वागावे याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची नितांत गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. घटनेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संबंधित मुलीने दोघांची नावे दिली होती.
त्यात एका ५५ वर्षांच्या पहारेकऱ्याचा आणि पाच वर्षांच्या मुलाचा समावेश होता. दरम्यान, मुलीने या मुलाला ओळखून त्याने आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शाळा गाठून त्याला पोलीस ठाण्यात आणले आणि त्याची चौकशी केली.
पाच वर्षांच्या मुलाची विनयभंगप्रकरणी पोलीस चौकशी
आपल्या वर्गमैत्रिणीचा विनयभंग केल्याच्या कथित आरोपाप्रकरणी एका पाच वर्षांच्या मुलाला पोलीस ठाण्यात नेऊन त्याची चौकशी केल्याच्या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली.
First published on: 29-01-2015 at 02:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police to inquiry five years old child molestation case