रहस्यमरीत्या गायब झालेली अभिनेत्री अलका पुनेवार (४५) हिचा शोध अखेर लागला आहे. आपल्या प्रियकरासोबत ती चेन्नईला सापडली आहे. प्रियकरासोबत ती पळून गेली होती. मात्र कुणाला कळू नये यासाठी स्वत:च आपली गाडी मित्राच्या मदतीने खोपोली येथील घाटात टाकून आपल्याच मृत्यूचा बनाव तिने रचला होता.
काही हिंदी चित्रपटांत दुय्यम भूमिका करणारी अलका पुनेवार २७ डिसेंबरला पुण्याला चित्रिकरणासाठी जाते, असे सांगून निघाली होती. त्यानंतर ती रहस्यमयरित्या बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी तिची गाडी खोपोली येथील घाटात आढळली होती.
विशेष म्हणजे, गाडीचे दार बंद होते आणि सिट बेल्ट उघडे होते. गाडीला अपघात झाला होता. मात्र मृतदेह सापडला नव्हता. अलकाचा मोबाईल फोन मात्र सापडला होता. परंतु त्यात सिमकार्ड नव्हते. त्यामुळे अलकाच्या बेपत्ता होण्याचे गूढ वाढले होते. तिचा मृत्यू झाला की तिचे अपहरण झाले हे सुद्धा समजत नव्हते.
दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने याप्रकरणात संजय सोनकर (३०) याला ताब्यात घेतले आणि या प्रकरणाला एक नाटय़मय वळण मिळाले.
पतीकडून त्रस्त, विवाहबाह्य़ संबंध..
पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले की, अलका पुनेवारचे आलोक पालिवाल (२८) या तरुणाशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आलोक हा अभियंता तसेच एमबीए पदवीधर आहे. संजय सोनकर हा आलोकचा अभियांत्रिकी महाविद्यालयापासूनचा मित्र होता. अलका पतीपासून त्रस्त होती. त्यामुळे आलोकसोबत पळून जाण्याचे तिने ठरवले. नव्याने आयुष्य सुरू करायचे होते. त्यामुळे तिने स्वत:च्याच मृत्यूचा बनाव रचला. २७ डिसेंबरला ती पुण्याला जाते, असे सांगून बाहेर पडली. मात्र ती रात्र तिने सीएसटीच्या प्रतीक्षालयात काढली. आलोक आणि संजयने ती गाडी घाटात टाकली आणि ते पुढे गेले. दुसऱ्या दिवशी अलका पुण्याला गेली. तेथून पुणे आणि नंतर आलोकसह बंगळूरला आणि नंतर चेन्नईला गेली. संजय सोनकर याने ही माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, चेन्नई पोलिसांनी अलका आणि तिच्या प्रियकर आलोकला ताब्यात घेतले असून त्यांना बुधवारी मुंबईत आणले जाणार आहे. संजयने चुकून एक मेसेज आलोकच्या बंद असलेल्या मोबाईलवर केला आणि तो धागा पकडून पोलिसांनी या गूढ नाटय़ाचा उलगडा केला.