वसई : अंधेरीतील १५ वर्षीय शाळकरी मुलीची हत्या करून फरार झालेला तिचा प्रियकर आणि मित्र अद्याप पोलिसांना सापडलेले नाही. हे दोन्ही आरोपी मोबाइल वापरत नसल्याने त्यांना पकडण्यात विलंब होत आहे. या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी गुजरात आणि राजस्थानच्या विविध जिल्ह्यांतील हॉटेल, लॉज आणि धर्मादाय संस्थांमध्ये शोध सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२६ ऑगस्ट रोजी नायगाव येथील उड्डाणपुलाच्या खाली पोलिसांना एका बॅंगेत एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह अंधेरीत राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीचा होता. तिचा प्रियकर संतोष मकवाना (२१) आणि त्याचा मित्र विशाल आंबवणे (२१) या दोघांनी तिची चाकूचे वार करून हत्या केल्याचे त्याच दिवशी निष्पन्न झाले होते.

पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू, बॅग जप्त केले. आरोपींची ओळख पटली, मात्र ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. या दोन्ही आरोपींनी मृतदेहाची बॅग ट्रेनमधून नायगावला आणली आणि तेथून वसईवरून गुजरातच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार वालीव पोलीस गुजरात आणि राजस्थानच्या विविध जिल्ह्यांत आरोपींचा शोध घेत आहे. या मुलीची जुहू येथे हत्या केल्यानंतर आरोपींनी मोबाईल बंद केला होता. त्यामुळे त्यांच्या माग काढण्यात अडचणी येत आहे. आरोपींची छायाचित्रे उपलब्ध नसल्याने पोलिसांनी त्यांची रेखाचित्रे तयार केली आहेत.

वालीव पोलिसांचा पुढाकार

ही मुलगी बेपत्ता असल्याचा गुन्हा अंधेरीत दाखल होता. पण तिची हत्या जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. मात्र तिचा मृतदेह वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. हत्या जुहूला झाल्याने जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. तरीदेखील वालीव पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला आहे. आरोपींना आम्ही लवकरच अटक करू. त्यांचा शोध घेण्याबरोबरच आम्ही भक्कम पुरावे जमा करत आहोत. ज्यामुळे त्यांना कठोर शिक्षा होईल असे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल पाटील यांनी सांगितले.

हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही या प्रकरणात मारेकरी निश्चित झाले असले तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा प्रियकर संतोष मकवाना याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. तो राग मनात धरून हत्या केल्याची एक शक्यता आहे. तर पीडित मुलीची अन्य मुलांशी मैत्री असल्याने हे कृत्य केल्याची देखील शक्यता आहे. जोपर्यंत आरमेपी सापडत नाही तोपर्यंत नेमके कारण स्पष्ट होणार नाही, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police tracing boyfriend and friend in 15 year old schoolgirl murder case zws