गणेशोत्सव पार पडेपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, अशी भूमिका पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घेतल्याने शासनाने आता बदल्यांसाठी ५ सप्टेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या तूर्तास लांबणीवर गेल्या आहेत.
करोनामुळे पोलीस दलातील नियमित बदल्याही रखडल्या आहेत, तर काही पदांवर अधिकाऱ्यांना बढत्या मिळूनही त्यांना नवीन नियुक्त्या मिळू शकलेल्या नाहीत. काही पदे रिक्त असून अन्य अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती आहे. या समितीने केलेल्या शिफारशींमध्ये शासनाने काही बदल करून ती यादी महासंचालकांकडे पाठविली. मात्र त्यांनी त्यास विरोध केल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीत पोलिसांच्या बदल्यांवरून एकमत न झाल्याने बदल्यांकरिता निश्चित करण्यात आलेली १५ ऑगस्टची मुदत आता गृह खात्याकडून पाच सप्टेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे.