मोबाइल चोरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे बुधवारी पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. आरोपींनी पोलिस शिपायाच्या हातावर फटका मारून त्यांचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांचा पाठलाग केला असता आरोपींनी घेरून इंजेक्शन दिले. माटुंगा व शीव रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तो गुन्हा दादर रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> मुंबई : उर्वरित गिरणी कामगारांच्या घरांसाठी ठोस पावले उचला, कामगार दिनी गिरणी कामगारांची मागणी
मृत विशाल पवार मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्रागार विभागात (एलए) कार्यरत होते. ते रविवारी (२८ एप्रिल) लोकलमधून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना माटुंगा व शीव स्थानकादरम्यान त्यांच्या हाताला चोरट्यांनी फटका मारला. त्यावेळी त्यांचा मोबाईल खाली पडला. तो घेऊन पळणाऱ्या चोरट्याचा मागे पवार यांनी धाव घेतली. त्यावेळी काही अंतर गेल्यावर त्या चोरट्याचे इतर साथीदार तेथे आले. त्यांनी पवार यांंना एक इंजेक्शन दिले. त्यावेळी पवार बेशुद्ध झाले. त्यांना १२ तासानंतर, सोमवारी जाग आली. त्यानंतर ते लोकल पकडून ठाण्यातील घरी गेले. तेथे गेल्यावर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा >>> मुंबई : आयपीएस अधिकारी रहमान यांची निवडणूक लढण्याची शक्यता धूसर?
रुग्णालयात त्यांनी स्थानिक पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती दिली. त्यानंतर पवार यांंची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९२, ३९४ व ३२८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण घटना दादर रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे हा गुन्हा दादर रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दादर पोलीस याप्रकरणी भादंवि कलम ३०२ अंंतर्गत हत्येचे कलम वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.