मुंबई : हत्या, हत्येचा प्रयत्न आणि दंगलीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बडतर्फ करण्यात आलेल्या पोलीस शिपायाला पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे. ताडदेव स्थानिक शस्त्रास्त्र विभागात तैनात असलेले पोलीस शिपाई श्याम महादेव कुरील यांच्याविरोधात २०१७ मध्ये हिंगोली येथे हा गुन्हा दाखल झाला होता. त्यात एक व्यक्ती ठार आणि पाच जण गंभीर जखमी झाले होते.
गुन्ह दाखल झाल्यानंतर कुरील यांना २०१७ मध्ये निलंबित करण्यात आले होते आणि जुलै २०२२ मध्ये त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. बडतर्फीच्या आदेशाला विरोध करत कुरील यांनी सरकारपुढे अपील केले होते आणि आपली बाजू मांडली होती. त्यानंतर सरकारने आठवडाभरापूर्वी त्याची ‘बडतर्फी’ची शिक्षा कमी केली आणि दोन वर्षे वेतनवाढ न देण्याची शिक्षा करण्यात आली. त्यानंतर कुरील यांना सेवेत पुन्हा रुजू केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा – मुंबई : रिक्षात बेशुद्धावस्थेत सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, हत्येचा गुन्हा दाखल
हिंगोली शहर येथील रोहिदास चौक येथे जितेंद्र कुरील या तरुणाची २०१७ मध्ये हत्या झाली होती. याप्रकरणी श्याम कुरील यांच्यासह १८ जणांविरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्याम हे सशस्त्र पोलीस दलात कार्यरत असल्यामुळे याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या विभागीय चौकशीत दोषी आढळल्यामुळे २०२२ मध्ये त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. दहिहंडीच्या आयोजनावरून १७ ऑगस्ट २०१७ रोजी झालेल्या वादातून जितेंद्र कुरील याची हत्या झाली होती. त्याप्रकरणी एकूण १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी मुंबई पोलीस दलातील दोन पोलिसांसह एकूण १८ आरोपींना अटक केली होती. करोनाकाळात या सर्वांना जामीन मिळाला होता.