विधान भवन परिसरात पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांच्यासह पाच आमदारांनी केलेल्या मारहाणीची पोलीस महासंचालक अथवा अन्य स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. एवढेच नव्हे, तर या आमदारांनी सूर्यवंशी यांना मारहाणीमुळे झालेली नुकसानभरपाई करावी, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
‘राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती’ या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे. याचिकेत या मारहाणीबाबत केलेल्या वृत्तसंकलानाप्रकरणी ‘एबीपी माझा’चे मुंबई प्रमुख राजीव खांडेकर आणि ‘आयबीएन लोकमत’ मुंबई प्रमुख निखील वागळे यांच्या विरोधात काढलेला हक्कभंग प्रस्तावही रद्द करावा तसेच राज्याचे पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांनी प्रकरणाची सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करावीत, अशी मागणी पाटील यांनी या याचिकेत केली आहे.

Story img Loader