लोकसत्ता खास प्रतिनधी
मुंबई : ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० वर्षीय तरूणाने शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मृत तरूणाचे वडील पोलीस विभागात हवालदार पदावर कार्यरत आहेत. वडिलांच्या सर्विस रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून मुलाने आत्महत्या केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
ना. म जोशी मार्ग पोलिसांच्या हद्दीत दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. पोलीस हवालदाराच्या मुलाने घरातील शौचालयात जाऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. २० वर्षीय हर्ष म्हस्के याने वडिलांच्या सर्विस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस हवालदार संतोष म्हस्के याचा तो मुलगा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संतोष म्हस्के हे एसपीयू युनिटमध्ये कार्यरत असून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत तैनात आहेत. दुपारी १ च्या सुमारास घटना घडल्यानंतर तरूणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
© The Indian Express (P) Ltd