बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्णालयामध्ये मौखिक पोलिओ लसीकरण आणि पिवळ्या तापाच्या (पिवळा ज्वर) लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा मुंबई विमानतळाचे आरोग्य अधिकारी डॉ. अच्छेलाल पासी यांच्या प्रमुख उपस्थितीत ३० ऑक्टोबर २०२३ रोजी झाला. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत या केंद्रात पोलिओ आणि पिवळ्या तापाची लस लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.
हेही वाचा >>> मुंबई : विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू
आफ्रिकन देशात जाणाऱ्या भारतीयांना पिवळ्या तापाची लागण होऊ नये, म्हणून केंद्र सरकारच्या नियमानुसार पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक असते. त्यानुसार कूपर रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभागातंर्गत सुरू केलेल्या लसीकरण केंद्रामध्ये आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत लाभार्थींना लस उपलब्ध असेल. पिवळ्या तापाच्या (पिवळा ज्वर) लसीकरणासाठी प्रति लाभार्थी ३०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर पोलिओचे लसीकरण पूर्णपणे मोफत असेल. पिवळ्या तापाच्या लसीकरणासाठी येताना लाभार्थ्याला त्याचे पारपत्र (पासपोर्ट) सोबत असणे गरजेचे आहे. या सोहळ्याला रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र केंभावी, डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. संजय पांचाळ, डॉ. प्रसाद ढिकले, डॉ. रोशनी मिरांडा, डॉ. कीर्ती सुपे, अनिकेत इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी १० पेक्षा जास्त नागरिकांनी पिवळा ज्वर प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला.
हेही वाचा >>> परराज्यातील औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एफडीएचे संकेतस्थळ
कायमस्वरूपी मिळणार पिवळा ताप लसीकरणाचे प्रमाणपत्र
आफ्रिकन देशात जाणाऱ्या भारतीयांना पिवळ्या तापाची लागण होऊ नये यासाठी लसीकरणानंतर देण्यात येणारे प्रमाणपत्र हे पूर्वी दहा वर्षासाठी ग्राह्य धरले जात असे. परंतु, यापुढे देण्यात येणारे प्रमाणपत्र हे कायमस्वरूपी ग्राह्य धरले जाणार आहे. लसीकरणानंतर लाभार्थ्याला अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येईल त्यानंतर त्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.