मुंबई: विधानपरिषद सदस्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या मुंबईतील गुप्तभेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीच्या वेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर उपस्थित होते. तिघांच्या या भेटीमागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण सत्तार यांनी दिले आहे.
१२ जुलै रोजी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. एका उमेदवाराला २३ आमदारांच्या मतांची गरज आहे. शिवसेना ठाकरे गटाने पक्षाचे सचिव व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. नार्वेकर यांच्या विजयासाठी आठ आमदारांच्या मताची कमतरता आहे. लोकसभा निवडणूकीनंतर महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. मराठवाड्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. मराठा समाजाने महायुतीच्या विरोधात मतदान केले आहे. त्यामुळे ही अस्वस्थता मराठवाड्यात जास्त आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत मराठवाड्यातील आमदार ठाकरे गटाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. मंत्री सत्तार यांच्यावर हिंगोली जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. अष्टीकर यांनी हिंगोली मतदार संघात महायुतीच्या बाबूराव कदम यांना एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभूत केले आहे. मराठवाड्यातील आमदारांशी संर्पक साधण्याची जबाबदारी अष्टीकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अष्टीकर यांनी सत्तार यांची मुंबईत गुप्तभेट घेतली. त्याचवेळी संतोष बांगर उपस्थित होते. या भोटीचा कोणताही राजकीय उद्देश नाही असे सत्तार यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शक्तिशाली नेते असून आपण त्यांच्या मागे असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील नागरी कामांसाठी आपण पालकमंत्री यांना भेटल्याचे अष्टीकर यांनी सांगितले. यामागे कोणताही राजकीय उद्देश नाही असे अष्टीकर यांनी सांगितले.