मुंबई : निवडणूक तोंडावर आली असतानाही पितृपक्षामुळे रखडलेल्या राजकीय घडामोडींना आज, गुरुवारपासून वेग येणार आहे. पक्षांतर, जागावाटप, प्रचार दौरे यासाठी तिष्ठत राहिलेली नेतेमंडळी घटस्थापनेच्या मुहूर्तापासून आपले राजकीय ‘रंग’ दाखवण्यास सुरुवात करण्याची शक्यता आहे. त्यातच येत्या दहा दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असल्याने सरकारदरबारीही निधी मंजुरी आणि कामांच्या घोषणा करण्याची घाई असून शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ८ ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणा या राज्यांच्या विधानसभांचे निकाल जाहीर झाल्यावर कधीही लागू होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) दसरा मेळाव्यावर बंधने यावीत या दृष्टीने आचारसंहिता दसऱ्यापूर्वी म्हणजे १२ ऑक्टोबरच्या आधी लागू शकते, अशी कुजबुज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी मुंबई, ठाण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मेट्रो-३ प्रकल्पाच्या  उद्घाटनाबरोबरच ठाण्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमातून महायुती आचारसंहितेपूर्वी भव्य शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. मोदी यांचा या दौऱ्यातून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> Rahul Gandhi : राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार, संविधान सन्मान संमेलनाला उपस्थिती

मुंबई आणि कोकणच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी महायुतीतील जागावाटपाबाबत चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनीही शहा यांच्याशी बुधवारी सकाळी या संदर्भात चर्चा केली. भाजप १५५ जागा लढवण्यावर ठाम आहे. मात्र िशदे आणि अजित पवार यांनी आपल्या वाटयाला अधिक जागा याव्यात, असा आग्रह धरल्याचे समजते. दुसरीकडे, महाविकास आघाडीतही जागावाटपाची चर्चा सुरू असून दसऱ्यापर्यंत ते अंतिम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जागावाटपाचा निर्णय अंतिम झाला नसला तरी तीन-तीन पक्षांच्या युती-आघाडीत डावलले जाण्याची किंवा मतदारांकडून फटका बसण्याच्या शक्यतेने अनेक जण पक्षांतराच्या तयारीत आहेत. मात्र गणेशोत्सव व त्यानंतर राजकीय मंडळींकडून अशुभ मानला जाणारा पितृपंधरवडा यांमुळे या घडामोडी थंडावल्या होत्या. आता घटस्थापनेपासून अशा मंडळींच्या पक्षांतराच्या माळा लागण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाची आजही बैठक

राज्य मंत्रिमंडळाच्या दोन आठवडयांमध्ये झालेल्या बैठकांमध्ये १०० पेक्षा अधिक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच अनेक शासन निर्णय जाहीर करण्यात आले. आता गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध समाजघटकांना खूश करण्यासाठी कोणते निर्णय घेतले जातात, याकडे लक्ष लागले आहे. मंत्रालयात सध्या कामे मंजूर करण्याबरोबरच निधीचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठीही गर्दी होत आहे.

पक्षांतराची मुहूर्त पर्वणी

नव्या राजकीय समीकरणांत महाविकास आघाडी किंवा महायुतीत जागा मिळत नाही हे पाहून हे पक्षांतर होण्याची चिन्हे आहेत. इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचा आमदार असल्याने त्यांनाच ही जागा मिळेल असे गृहीत धरून भाजप नेते हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीच्या (शरद पवार) वाटेवर असल्याचे समजते. पश्चिम महाराष्ट्रातील आणखीही काही नेते शरद पवारांच्या पक्षात जाण्यास इच्छुक आहेत.