राज्याची उपराजधानी नागपूरमधून केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचं (CBWE) मुख्यालय दिल्लीला हलवण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपात चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी हे मुख्यालय हलवल्यावरून मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं. तसेच मोदी सरकार महत्त्वाच्या संस्था महाराष्ट्राबाहेर हलवून महाराष्ट्राचं महत्त्व कमी करत असल्याचा आरोप केला. यावर भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं.
सचिन सावंत म्हणाले, “CBWE चे मुख्यालय नागपुरातून दिल्लीला हलवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध! मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महत्त्वाच्या संस्थांना महाराष्ट्राबाहेर हलवून महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाने विविध सामाजिक-आर्थिक समस्यांवर जागरुकता निर्माण करून संघटित आणि असंघटित कामगारांच्या सक्षमीकरणासाठी काम केले आहे.”
“इतर कोणत्याही सरकारला नागपूर मुख्यालयाबाबत कोणतीही अडचण नव्हती. मोदी सरकारचा हा निर्णय आजवरचा महाराष्ट्राबद्दलचा आकस अधोरेखित करत असून त्याचा विरोध झालाच पाहिजे,” असंही सचिन सावंत यांनी नमूद केलं.
भाजपा नेते केशव उपाध्ये काय म्हणाले?
सचिन सावंत यांच्या टीकेवर केशव उपाध्ये म्हणाले, “‘स्व. दत्तोपंत ठेंगडी नॅशनल बोर्ड फॉर वर्कर्स एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट’चे नागपूर येथील कार्यालय दिल्लीला नेण्यावरून काही लोकांच्या पोटात दुखते आहे आणि पुन्हा एकदा बुद्धीभेद केला जात आहे. मुळात येथील प्रशासकीय कार्यालय दिल्लीत जात आहे आणि सबरिजनल कार्यालय हे नागपुरातच असेल.”
“या बोर्डच्या कामाचा विस्तार केल्याने प्रशासकीयदृष्ट्या सुविधा व्हावी, म्हणून दिल्लीत मुख्यालय असेल. बाकी नागपुरातील कार्यालयावर किंवा कामावर त्याचा परिणाम होणार नाही. असो, आपल्याला आणि महाविकास आघाडी सरकारला विदर्भाबद्दल पुळका असेल, तर सांगा? वैधानिक विकास मंडळं का बंद केली? विदर्भ-मराठवाड्याची वीज सवलत का बंद केली? सिंचन, रस्ते यासाठी निधी देणे का बंद केले? अनुशेषाचे पैसे का थांबविले? जिल्हा नियोजन समितीच्या निधीला इतकी कात्री का लावली? सांगा सचिन सावंतजी?” असे अनेक सवाल केशव उपाध्ये यांनी सचिन सावंत यांना विचारले.
हेही वाचा : “…और भक्त कहते हैं भारत इनके हाथ में सुरक्षित है ” ; सचिन सावंत यांनी साधला निशाणा!
केशव उपाध्ये यांच्या प्रत्युत्तरावर पुन्हा एकदा सचिन सावंत यांनी हल्लाबोल करत हाच भाजपाचा महाराष्ट्र द्रोह असल्याचा हल्लाबोल केला. सावंत म्हणाले, “६३ वर्षे महाराष्ट्रात असलेले CBWE चे मुख्यालय आकसापोटी मोदी सरकार दिल्लीला नेत असेल तर महाराष्ट्राचा अभिमान असल्याने आमच्या पोटात दुखणारच! मुख्यालयाऐवजी उपविभागीय कार्यालय झाल्याने महाराष्ट्राचे महत्व कमी होणार याचे सोयरसुतक नसणे हाच भाजपाच्या महाराष्ट्र द्रोहाचा पुरावा आहे.”