‘प्रभाग’फेरी : एल वॉर्ड
अंतर्गत भाग : कुर्ला, नेहरू नगर, जरीमरी, कामगार नगर, म्हाडा कॉलनी, कुर्ला टर्मिनस आणि चांदिवली
नदी क्षेत्रात संस्कृती विस्तारते हे या शहरापुरते तरी साफ चुकीचे ठरले आहे. शहरातील सर्वात मोठी नदी असलेल्या मिठी नदीच्या परिसरात असलेला एल वॉर्ड हे त्याचे अगदी उत्तम उदाहरण. २६ जुलच्या प्रलयानंतर मिठी नदीचे नाव सर्वतोमुखी झाले. या नदीचा ८० टक्के भाग हा एल वॉर्डमध्ये येतो. गेल्या दहा वर्षांत या नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणासाठी शेकडो कोटी रुपये पाण्यात वाहून गेले आहेत, मात्र मिठी नदी व आजूबाजूच्या परिसराची अवस्था काही केल्या सुधारत नाही. दोन्ही बाजूंनी व संपूर्ण एल वॉर्डमध्ये पसरलेल्या झोपडपट्टीच्या समस्या याच या विभागाच्या समस्या आहेत.
कोणत्याही परवान्याशिवाय चालवली जाणारी भंगार दुकाने, गॅरेज, कारखाने यामुळे होणारे प्रदूषण हे केवळ याच विभागासाठी नाही, तर शहरासाठीही डोकेदुखी आहे. कुर्ला स्थानकाजवळील कामगार
नगरसारखा मध्यमवर्गीय विभागही आहे. मात्र कुर्ला म्हटले की आठवते ती रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी लांबच लांब पसरत गेलेली झोपडपट्टी व प्रशासकीय यंत्रणांचा अभाव.
‘एआयएमआयएम’चा फटका कुणाला?
गेल्या वेळच्या निवडणुकांमधील १५ प्रभागांमध्ये शिवसेनेचे पाच, सपा, मनसे व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन, भाजपचा एक नगरसेवक आहे. या विभागातून गेल्या वेळी तीन अपक्ष नगरसेवक निवडून आले. या वेळी ओवेसी यांचा ‘एआयएमआयएम’ हा पक्षही निवडणूक रिंगणात उतरला असून कुर्ला येथे त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस व सपाला फटका पडण्याची शक्यता आहे. कुल्र्याच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय मराठी वस्तीत शिवसेनेची पकड आहे.
टेकू लावलेले रुग्णालय
दुरुस्ती सुरू असलेले भाभा रुग्णालय दुरुस्तीपलीकडे गेल्याचा अहवाल दोन वर्षांपूर्वी आला व एका दिवसात रुग्णालयाला टाळे ठोकण्यात आले. परिसरातील लोकांसाठी अडीनडीला असलेला एकमेव आधारही गेल्याने राजकीय पक्ष आंदोलनात उतरले. त्यानंतर तात्पुरती दुरुस्ती करून विधानसभा निवडणुकांसाठी रुग्णालय सुरू केल्याचे दाखवण्यात आले. मात्र आजतागायत रुग्णालयाचे टेकू काढलेले नाहीत. त्यामुळे रुग्णालयातच दुर्घटना होण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येते.
पाण्याच्या टाक्यांवर अनधिकृत बांधकामे
दोन वर्षे पाण्याची समस्या असल्याने न्यू मिल रोडवर अनेक ठिकाणी पाच हजार लिटरची क्षमता असलेल्या पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या. आता पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू झाल्याने पाण्याच्या टाक्या गायब झाल्या आहेत व टाक्यांसाठी लावलेल्या कडप्पावर दुकाने बांधण्यात आली, असे विश्वास कांबळे यांनी सांगितले.
फेरीवाल्यांमुळे कोंडी
कुर्ला स्थानकांच्या दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांनी जम बसवला आहे. आधीच अनधिकृत जागेवर बांधलेली दुकाने आणि त्यापुढे फेरीवाले यामुळे रस्त्याचा अर्धाअधिक भाग व्यापला जातो. त्यांची कमतरता पूर्ण करत रिक्षावाले उरलेल्या जागेवर कब्जा करतात. या सगळ्यात भरडला जातो तो पादचारी प्रवासी.
स्मशानभूमीत विद्युतदाहिनीची मागणी
सोनापूर हिंदू स्मशानभूमीत अजूनही लाकडाचे सरपण वापरले जाते. शहरात इतरत्र विद्युतवाहिन्या वापरल्या जात असल्याने या विभागातही अशी सुविधा देण्याची मागणी काही संस्थांनी केली होती. मात्र अजूनही त्यावर कार्यवाही झालेली नाही.
मिठी नदी?. नव्हे, नालाच!
२६ जुलैचा महाप्रलय दाखवणाऱ्या मिठी नदीचा ८० टक्के भाग एल वॉर्डमध्ये येतो. एमएमआरडीए व पालिकेने मिठी नदीवर आतापर्यंत शेकडो रुपये खर्च केले आहेत. मात्र आतापर्यंत नदीसंबंधी झालेली कामे पाहता आणखी दहा वर्षे तरी मिठीची समस्या सुटणार नाही, असे दिसते. या नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या झोपडय़ांचे पुनर्वसन व पुन्हा अतिक्रमण न होण्यासाठीही प्रयत्न करावे लागत आहेत.
वाहतूक कोंडी
सांताक्रूझ-विक्रोळी लिंक रोडमुळे काही भागाला फायदा झाला असला तरी इतर अरुंद रस्ते व फेरीवाले यामुळे वाहतूक कोंडी होतेच. काही ठिकाणी पालिकेने रस्ते रुंदीकरणाचा प्रयत्न केला. मात्र अनेक ठिकाणचे बॉटलनेक काढता आले नसल्याने रुंद केलेल्या रस्त्यांचाही विशेष फायदा होत नाही.
दरडींची समस्या
हा विभाग डोंगराळ आहे. मात्र सर्वच डोंगर अतिक्रमित बांधकामांनी व्यापले आहेत. पावसाळ्यात या भागात दरडी कोसळून अनेकांच्या झोपडय़ा पडतात, अनेक जण जखमी होतात. पालिका पावसाळ्याआधी या भागात नोटीस लावून झोपडय़ा रिकाम्या करण्यास सांगते. मात्र जिवाच्या भीतीपेक्षा जागेची किंमत अधिक वाटल्याने येथील माणसे हटत नाहीत
अनधिकृत बांधकाम
शहरात सर्वत्रच अनधिकृत बांधकाम दिसते. मात्र कुर्ला येथे अधिकृत बांधकाम शोधावे लागेल, अशी स्थिती आहे. मोकळ्या जागा, गटारे, उंचवटे, डोंगरउतार, पाइपलाइन, मिठी नदीचा किनारा.. यत्र, तत्र, सर्वत्र अनधिकृत बांधकामे आहेत. त्यामुळे पालिकेनेही कारवाई करायची म्हटली तर नेमकी किती व कुठे करावी, हा प्रश्न पडतो.
रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर, रिक्षांच्या स्टॅण्डवर नगरसेवक स्वत:कडे श्रेय घेण्यासाठी फलक लावतात. याच नगरसेवकांच्या आशीर्वादाने कुर्ला येथे हजारो अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. मग नगरसेवक त्यांच्यावर स्वत:ची नावे का लावत नाही? कुर्ला स्थानकाबाहेर गटारावर दुकाने बांधली असून त्यापुढे फेरीवाले बसतात. मात्र वर्षांनुवर्षे तक्रारी करून प्रश्न सुटलेला नाही.
विश्वास कांबळे, अध्यक्ष, सेवा संस्कृती सामाजिक संस्था
विकास आराखडय़ामध्ये एल वॉर्डमध्ये मोकळ्या जागा, रुग्णालय, शाळा यांच्यासाठी जेवढी आरक्षणे लिहिली आहेत, तेवढी प्रत्यक्षात उतरली तर हा वॉर्ड संपूर्ण शहरातील सर्वात सुंदर विभाग होईल. मात्र आराखडय़ात दिसत असलेल्या मोकळ्या जागांपैकी एकही शिल्लक नाही.
अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ता
एल वॉर्डचे साहाय्यक आयुक्तांच्या प्रगतिपुस्तकावर आयुक्तांनी लाल शेरा मारला होता. मात्र त्यानंतरही या विभागात काम सुधारलेले नाही. अनेक ठिकाणी सहा-सहा मजली अनधिकृत इमारती दिवसाढवळ्या काम करून उभ्या राहत आहेत. या ठिकाणी कमी किमतीत जागा उपलब्ध असल्याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी कब्जा केला आहे.
स्मिता कदम, कुर्ला