मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघातील राजकीय घडामोडींमुळे आपली अवहेलना झाल्याचा ठपका ठेवत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यांचा सारा रोख हा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आहे; पण राज्य काँग्रेसमध्ये हा वाद निर्माण होण्यास स्वत: थोरात की नाना पटोले हे जबाबदार आहेत याची पक्षाकडून माहिती घेतली जात आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या नेतृत्वाला पत्र पाठविले. त्यात त्यांनी या साऱ्या घोळास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरले. सत्यजित तांबे यांनी आपल्याला पक्षाचे अधिकृत पत्र (ए व बी फॉर्म) मिळाले नाही म्हणून अपक्ष अर्ज दाखल करावा लागल्याचे सांगितले. यावर दोन कोरे फॉर्म पाठविले होते, असा नाना पटोले यांचा दावा आहे.
तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यावर काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती; परंतु त्यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करावी, अशी दिल्लीतील नेत्यांची अपेक्षा होती. त्यानुसार तांबे यांनी चार वेगवेगळे मसुदे पाठविले होते; पण दिल्लीतील नेत्यांनी दिलगिरी कशी असावी यात घोळ घातला. दिलगिरी पत्राबाबत पक्षाचे संघटन सरचिटणीस वेणूगोपाळ यांनी तात्काळ निर्णयच घेतला नाही. अन्यथा हा गोंधळ संपुष्टात आला असता, असे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येते.
सत्यजित तांबे यांच्याबाबत झालेल्या घोळाला बाळासाहेब थोरात यांनाच जबाबदार धरले जात आहे. त्यांनी आधीच सत्यजित तांबे यांच्या नावाची शिफारस केली असती तर हा गोंधळ झाला नसता. थोरात यांनी सत्यजित यांचे वडील व आमदार सुधीर तांबे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली याकडे प्रदेश काँग्रेसचे नेते लक्ष वेधत आहेत. आता पटोले यांना दोष देण्यात काय अर्थ आहे, असाही सवाल प्रदेश नेते करीत आहेत.
थोरात यांच्याबाबत खरगे यांची भूमिका महत्त्वाची
नाशिकमधून झालेल्या गोंधळात बाळासाहेब थोरात यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून दूर करावे, असा एका गटाचा प्रयत्न आहे. सरचिटणीस वेणूगोपाळ हे थोरात यांच्याबाबत फारसे अनुकूल नाहीत. पक्षांतर्गत वातावरण विरोधात जाऊ लागल्यानेच थोरात यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भूमिका आता महत्त्वाची असेल. खरगे हे राज्याचे प्रभारी असताना त्यांचे आणि थोरात यांचे फारसे सख्य नव्हते, असे सांगण्यात येते. तरीही दिल्लीतील नेते थोरात यांना लगेचच नाराज करणार नाहीत असे मानले जात आहे.