मुंबई : गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात येणारे ‘दिवाळी पहाट’ व ‘दीपसंध्या’ कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागले आहेत. राजकीय पक्षांतील नेते, पदाधिकारी मतदारांना आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे राजकीय मंडळींनी ‘दिवाळी पहाट’ व ‘दीपसंध्या’ या कार्यक्रमांच्या आयोजनात आखडता हात घेतला आहे. परिणामी, राजकीय मंडळींची शक्तिप्रदर्शन करण्याची संधी हुकली असून कलाकारांसह आयोजकांचेही आर्थिक गणित बिघडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई व ठाण्यासह राज्यभारात ठिकठिकाणी दरवर्षी ‘दिवाळी पहाट’ व ‘दीपसंध्या’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तर अलीकडच्या काळात सणांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडूनही सदर कार्यक्रमांचे आयोजन होऊ लागले. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेमुळे राजकीय मंडळींनी आखडता हात घेतला आहे. विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनी दिवाळीनिमित्त कार्यक्रमांचे सशुल्क स्वरुपात आयोजन केले आहे. गेल्या काही वर्षी राजकीय मंडळींनी दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना प्रेक्षकांना नि:शुल्क प्रवेश दिला होता. त्यामुळे प्रेक्षकांचा या कार्यक्रमांकडे कल वाढला होता. मात्र यंदा राजकीय मंडळींनी कार्यक्रमच रद्द केल्यामुळे सशुल्क कार्यक्रमांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात याबाबत आयोजक साशंक आहेत.

हेही वाचा – कांजूरमार्ग कारशेड पुन्हा वादात, मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडच्या कामाला न्यायालयाची स्थगिती

दरम्यान, या कार्यक्रमांसाठी आयोजकांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वावर सभागृह उपलब्ध झालेले आहे. सभागृह उपलब्ध होऊ न शकलेले कार्यक्रम नेहमीप्रमाणे खुल्या पटांगणात व मोकळ्या मैदानात होत आहेत. तसेच अनेकांनी प्रसिद्धीसाठी विविध माध्यमांसह विशेष सामाजिक माध्यमांचाही पर्याय निवडला असून डिजिटल फलक, चित्रफितीच्या माध्यमातून कार्यक्रमांची आकर्षक पद्धतीने समाजमाध्यमांवर जाहिरातबाजी सुरू केली आहे.

‘विधानसभा निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेमुळे बहुसंख्य राजकीय मंडळींनी नियोजित ‘दिवाळी पहाट’ व ‘दीपसंध्या’ कार्यक्रम रद्द केले आहेत. ऐनवेळी हे कार्यक्रम रद्द झाल्यामुळे कलाकारांचेही नियोजन बिघडले आहे. तसेच कलाकार व आयोजकांनाही आर्थिक फटका बसला आहे. मात्र विविध संस्थांमार्फत ‘दिवाळी पहाट’ व ‘दीपसंध्या’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कलाकार व आयोजकांमध्ये या कार्यक्रमांसाठी योग्य समन्वय साधत आहे’, असे बासरीवादक प्रणव हरिदास यांनी सांगितले.

व्यावसायिकांचे कार्यक्रम सुरू

‘दिवाळी पहाट’ व ‘दीपसंध्या’ कार्यक्रम रद्द केले असून कलाकारांसह आयोजकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र स्वत:चा व्यवसाय अनेकांपर्यंत पोहोचवून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गेल्या काही वर्षांत विकासक, उद्योजक व व्यावसायिक संस्थांकडूनही दिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होऊ लागले. त्यामुळे राजकीय मंडळींनी कार्यक्रम रद्द केले तरीही व्यावसायिकांच्या कार्यक्रमांमध्ये वाढ झाली आहे. या कार्यक्रमांनाही विनामूल्य प्रवेश असल्यामुळे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे’, असे ‘जीवनगाणी’च्या प्रसाद महाडकर यांनी सांगितले.

हेही वाचा – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ‘लोकसत्ता लेक्चर’मध्ये विचार मांडणार; लोकसत्ता ऑनलाइनच्या युट्यूब चॅनलवर लाइव्ह

विजयानंतर पर्वणी?

ऐन दिवाळीतच आचारसंहिता जारी झाल्यामुळे राजकीय मंडळींना पूर्वनियोजित ‘दिवाळी पहाट’ व ‘दीपसंध्या’ कार्यक्रम रद्द करावे लागले. परिणामी राजकीय मंडळींची शक्तिप्रदर्शन करून मतदारसंघावर घट्ट पकड करण्याची संधी हुकली. त्यामुळे संबंधित विभागावर लक्ष केंद्रित करून नागरिकांना आकर्षित करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळल्यानंतर राजकीय मंडळींकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याचे समजते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political leaders absence on diwali pahat due to election code of conduct mumbai print news ssb