ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने मराठी कविता सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय करणारा आणि तरुणाईच्या भावनांना शब्दरुप देणारा कवी हरपला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, मराठी कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात पाडगावकर यांचे मोठे योगदान होते. मराठी कवितेच्या सादरीकरणाला व्यापक परिमाण देतानाच ती खऱ्या अर्थाने लोकप्रिय केली. त्यांची कविता जशी उत्कट प्रेमभावना समर्थपणे व्यक्त करण्यात यशस्वी ठरली. त्याचप्रमाणे ती प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धच्या धगधगत्या विद्रोहाचे प्रतीकही होती. सत्तरीच्या दशकातील त्यांची सलाम ही कविता याच भावनेचा प्रभावी अविष्कार आहे. त्यांनी इतर भाषेतील उत्तमोत्तम साहित्याचाही प्रभावी अनुवाद करुन मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ‘या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे’ अशा अवीट गीतांसह बालकुमारांना रिझवणाऱ्या ‘सांग सांग भोलानाथ’ यासारख्या नितांतसुंदर रचनाही त्यांनी निर्मिल्या. कवितेतील रसिकता त्यांनी जगण्यातही जोपासली.
मराठी साहित्य आणि मराठी माणूस मोठा करणारा कवी हरपला- राज ठाकरे</strong>
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून पाडगावकरांना श्रद्धांजली वाहिली. मराठी साहित्य आणि मराठी माणूस मोठा करणारा कवी हरपल्याची प्रतिक्रिया राज यांनी दिली. राज म्हणाले की, अगदी लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत अशा सर्वांवर आपल्या कविता मनमुराद उधळणारा मंगेश पाडगावकरांसारखा दुसरा कवी मराठीत नाही. मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती त्यानं मोठी झाली. त्यामुळेच आमचे जगणेही समृद्ध झाले. त्यांनी ‘उदासबोध’ या काव्यसंग्रहातून आम्हा राजकारण्यांना मारलेले फटकेही मोलाचे आहेत. मराठी साहित्य आणि मराठी माणून मोठा करणारा हा कवी. त्यांना माझी आणि माझ्या पक्षाची भावपूर्ण श्रद्धांजली.
पाडगावकरांच्या जाण्याने राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचे मोठे नुकसान- विनोद तावडे
आपल्या कवितांमधून महाराष्ट्रातील मराठी रसिकांना प्रेम करायला शिकविणारे,जगण्याचे बळ देणारे आणि आपल्या सहज सोप्या कवितेतून रसिकांना जगण्याची प्रेरणा देणारे महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर काळाच्या पडद्याआड गेल्याने राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. मंगेश पाडगावकर यांनी अनेक पिढ्या महाराष्ट्रातील रसिकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने आज महाराष्ट्राच्या साहित्यसृष्टीतील जीवनगाणे थांबले असून त्यांच्या कवितांच्या या अनमोल अविष्काराला महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीने आपण ‘सलाम’ करीत आहोत, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
ज्यांच्या कवितांमुळे आमचे शालेय जीवन प्रफुल्लीत झाले होते अशा प्रतिभावंत कविवर्य मंगेश पाडगावकरांना माझी सविनय आदरांजली !!
– पंकजा मुंडे.
मराठीला आपल्या कवितांनी चिरतरूण करणाऱ्या कवी मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने साहित्यविश्वाची मोठी हानी झाली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली
– सुनील तटकरे.