ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने मराठी कविता सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय करणारा आणि तरुणाईच्या भावनांना शब्दरुप देणारा कवी हरपला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, मराठी कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात पाडगावकर यांचे मोठे योगदान होते. मराठी कवितेच्या सादरीकरणाला व्यापक परिमाण देतानाच ती खऱ्या अर्थाने लोकप्रिय केली. त्यांची कविता जशी उत्कट प्रेमभावना समर्थपणे व्यक्त करण्यात यशस्वी ठरली. त्याचप्रमाणे ती प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धच्या धगधगत्या विद्रोहाचे प्रतीकही होती. सत्तरीच्या दशकातील त्यांची सलाम ही कविता याच भावनेचा प्रभावी अविष्कार आहे. त्यांनी इतर भाषेतील उत्तमोत्तम साहित्याचाही प्रभावी अनुवाद करुन मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ‘या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे’ अशा अवीट गीतांसह बालकुमारांना रिझवणाऱ्या ‘सांग सांग भोलानाथ’ यासारख्या नितांतसुंदर रचनाही त्यांनी निर्मिल्या. कवितेतील रसिकता त्यांनी जगण्यातही जोपासली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा