मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मंगळवारी सकाळपासून गोविंदा पथके मानाची दहीहंडी फोडत मार्गस्थ होऊ लागली असून निरनिराळ्या पथकांतील गोविंदांनी परिधान केलेल्या टी-शर्टवर दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकीय नेत्यांची छबी झळकत होती. सर्वच राजकीय पक्षांतील आजी, माजी, भावी, इच्छुक लोकप्रतिनिधींची नावे झळकत होती. केवळ नावेच नाहीत, तर काही ठिकाणी टी-शर्टवरील राजकीय भाष्यही लक्षवेधी ठरत होते. ‘वरळीत पुन्हा आदित्यच’ असे लिहिलेले किंवा ‘जनमनाचा राजा…मुख्यमंत्री माझा’ असे नमुद केलेली टी – शर्टस् लक्ष वेधून घेत होती.
दहीहंडी उत्सव आणि राजकीय टी – शर्ट यांचे जुनेच नाते आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त गोविंदांना राजकीय पक्षांकडून टी-शर्ट देण्याची प्रथा जुनीच. मात्र यावेळी टी-शर्टना वेगळाच भाव आला आहे. राजकीय पक्षांकडून मिळालेली टी – शर्ट ही गोविंदांपेक्षा लोकप्रतिनिधींची अधिक गरज बनल्यासारखे दिसत होते. विधानसभेची निवडणूक जवळ आली असून त्यानंतर मुंबई महापालिकेची निवडणूकही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाची संधी सर्वच लोकप्रतिनिधींनी साधली आहे. एका ठिकाणी जाहिरात फलक लावण्यापेक्षा शेकडो कार्यकर्ते, गोविंदांना टी – शर्ट दिले की त्यांची जाहिरात आपोआपच होते. त्यामुळे टी – शर्ट देण्यात सर्वच आजी-माजी लोकप्रतिनिधी पुढे आहेत.
माजी नगरसेवकांनी, भावी आणि विद्यमान आमदारांनी आपल्या नावाची टी शर्ट गोविंदांना दिली आहेत. त्यातच एखाद्या शाखाप्रमुखानेही स्वतःच्या नावाचे टी – शर्ट छापून आपलीही राजकीय महत्त्वांकाक्षा दाखवून दिल्याचे चित्र पाहायला मिळत होते. टी – शर्ट देण्याची ही प्रथा विशेषतः शिवसेनेची. शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील लोकप्रतिनिधींनी आपापल्या नेत्यांची नावे आणि छबी असलेली टी – शर्ट वाटली आहेत. त्यामुळे काही ठिकाणी टी – शर्टवरील संदेशातून राजकीय आव्हान दिले जात होते. वरळी, लोअर परळ परिसरात ‘वरळीत पुन्हा आदित्यच’ असे नमुद केलेली टी – शर्ट गोविंदांनी परिधान केली होती. तर गिरगावात काही ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवणारी टी-शर्ट दिसत होती.
गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईत जिथे जिथे जातील तिथे तिथे या टी-शर्टमधून लोकप्रतिनिधींचा प्रचार सुरू होता. शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप यांच्याबरोबरच काही ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचीही टी – शर्ट दिसत होती. हे दृश्य निवडणूकांची चाहुल दर्शवत होते.
© The Indian Express (P) Ltd