मुंबई : मुंबई महापालिका सभागृहाच्या धर्तीवर मनसेने शनिवारी प्रतिसभागृह भरविले होते. या सभेत मुंबईतील विविध नागरी समस्या, रस्ते, आरोग्य, पालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आदींवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील विकासाच्या मुद्द्यांवर, तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी विविध पक्षीय नेत्यांना बोलावण्यात आले होते. मात्र, राजकीय पक्षांनी मनसेच्या प्रतिसभागृहाकडे पाठ फिरवली.

मुंबई महापालिकेची मुदत संपून तीन वर्षे झाली असून अद्याप मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही. परिणामी, महानगरपालिका सभागृहाची बैठक होऊ शकलेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या पुढाकारातून मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर मुंबई पत्रकार संघाच्या सभागृहात प्रतिसभागृह भरवण्यात आले होते. या प्रतिसभागृहासाठी आदित्य ठाकरे यांच्यासोबतच भाजपाचे आशिष शेलार, समाजवादी पक्षाचे रईस शेख, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या राखी जाधव, मुंबई काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, सर्व पक्षीय नेत्यांनी मनसेच्या प्रतिसभागृहाकडे पाठ फिरवली.

रस्ते काँक्रिटीकरणामुळे मुंबईकरांचे होणारे हाल, त्यातील भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची कामाप्रती उदासीनता, कामातील दिरंगाई, कंत्राटदारांचा हलगर्जीपणा आदी विविध मुद्द्यांवर सभागृहात चर्चा करण्यात आली. तसेच, रस्ते काँक्रीटीकरणाबाबत श्वेतपत्रिका काढण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.