मुंबई : दसऱ्यानिमित्त आज, मंगळवारी राज्यात मोठे मेळावे होणार आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या मुंबईतील मेळाव्यांमध्ये आजी-माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांची भाषणे होतील. पंकजा मुंडे यांचा बीडमधील पारंपरिक मेळावा होणार असून यंदा प्रथमच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही जाहीर सभा होणार आहे. यानिमित्त राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून सहा-सात महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंगही यानिमित्ताने फुंकले जाणार आहे.

दसऱ्यानिमित्त ‘विचारांचे सोने लुटण्यासाठी’ शिवसेनेचा दसरा मेळाव्याला जुनी परंपरा आहे. पक्षाच्या ५७ वर्षांच्या इतिहासात हे दसरा मेळावे दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी नेहमीच गाजले. आजवर केवळ दोनदा पावसामुळे मेळावा रद्द करण्याची वेळ आली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आणि गेल्या वर्षांपासून दोन दसरा मेळावे होऊ लागले. दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होईल. तर शिंदे गटाच्या वतीने आझाद मैदानात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे आणि शिंदे यांच्यात दसरा मेळाव्यांमधून परस्परांवर टीका आणि आरोप होणार, हे निश्चित आहे. गेल्या वर्षी ठाकरेंनंतर शिंदे यांचे भाषण झाले होते व त्यांनी आरोपांना उत्तरेही दिली होती. या वेळीही ठाकरेंनंतरच शिंदेंचे भाषण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा >>> कुणबी प्रमाणपत्र समितीच्या कामकाजावर परिणाम? तेलंगणमधील निवडणुकीचा फटका

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही ही परंपरा कायम ठेवली. मात्र राजकीय कार्यक्रमांना भगवान गडावर बंदी घालण्यात आल्यानंतर हा मेळावा भगवान भक्ती गडावर हलविला. गेला काही काळ पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे मंगळवारच्या मेळाव्यातून आपली राजकीय भूमिका मांडण्याची शक्यता असून त्यांच्या समर्थकांचे याकडे लक्ष असेल. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या विस्तारावर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून पक्षाचे युवा आमदार रोहित पवार पुणे ते नागपूर अशी युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. या यात्रेचा आरंभ आज, मंगळवारी पुण्यात होत आहे. यानिमित्त होणाऱ्या सभेला पवार मार्गदर्शन करतील.

नागपुरात संघाचे पथ संचलन, मेळावा

विजयादशमीनिमित्त नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथ संचलन आणि मेळाव्यालाही मोठी परंपरा आहे. संघाच्या स्थापनेला २०२५ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. याची पूर्वतयारी संघाने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत काय विचार देतात, याची उत्सुकता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाच्या गणवेशात कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. संगीतकार-गायक शंकर महादेवन हे यंदाच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे आहेत.

Story img Loader