मतदारराजाला खूश करण्यासाठी त्याला लक्ष्मीदर्शन घडवण्याच्या हेतूने राजकीय पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. रोख रकमांची वाहतूक करताना त्या पोलिसांच्या निदर्शनास पडू नये यासाठी पक्षातील महिला कार्यकर्त्यांचाच (लक्ष्मींचा) वापर केला जात आहे! मतदानासाठी केवळ ४८ तास उरले असल्याने लक्ष्मीदर्शनाची ही मोहीम तीव्र करण्यासाठी उमेदवारांनी ही शक्कल लढवल्याचे बोलले जात आहे. तसेच चारचाकी गाडीच्या इंजिनात दडवूनही काही ठिकाणी पैशांची वाहतूक केली जात आहे. वाहनांची तपासणी करताना पोलीस गाडीचा नेमका हाच भाग तपासत नसल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनीही याला दुजोरा दिला आहे.
placetohidemoneyincar1
गेल्या महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांनी कार्यकर्त्यांकडे रोख रक्कम पोहोचविण्यास सुरुवात केली. त्यानंतर पितृपंधरवडा संपल्यानंतर या रोख रकमेच्या वाहतुकीला वेग आला. २७ सप्टेंबर रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसानंतर ही वाहतूक दुपटीने वाढली. पोलिसांनी मागील आठवडय़ापासून मोक्याच्या ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. यात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रोख रकमेची ने-आण करताना पकडले गेले. त्यामुळे अनेक पक्षांच्या उमेदवारांची पंचाईत झाली असून यावर उपाय म्हणून काही उमेदवारांनी महिला कार्यकर्त्यांचा या वाहतुकीसाठी वापर करण्यास सुरुवात केली आहे. या तपासणी नाक्यांवर पोलीस महिलांच्या वाहनांची तपासणी करीत नसल्याचे आढळून आले आहे. अनेक पक्षाच्या महिला कार्यकर्त्यां तसेच बचत गटाच्या महिला दुचाकी वाहनाद्वारे ही रोख रक्कम कार्यकर्त्यांकडे पोहचविण्याचे काम करीत असल्याचे आढळून आले आहे.

पोलीस महिलांच्या वाहनांची तपासणी करतात मात्र त्यांची अंगझडती घेतली जात नाही. त्यामुळे महिला कार्यकर्त्यां त्यांचा फायदा घेण्याची शक्यता आहे.
– के. एल. प्रसाद, पोलीस आयुक्त, नवी मुंबई</strong>

Story img Loader